वर्षभरात एक हजार एसटी सीएनजीत परिवर्तित

या कामासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून एका वर्षांत हे काम पूर्ण होईल,

st bus
(संग्रहित छायाचित्र)

एसटी महामंडळाकडून एका कंपनीची नियुक्ती

मुंबई: इंधन बचत आणि तोटय़ातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने डिझेलवर धावणाऱ्या एक हजार बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून एका वर्षांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार बस आहेत. यात फक्त ५० बस सीएनजीच्या असून त्या ठाणे विभागात आहेत. तर पुणे ते अहमदनगर मार्गावर दोन बस या विजेवर धावणाऱ्या आहेत. आणखी १४८ विजेवरील बस लवकरच ताफ्यात येतील. महामंडळाकडे डिझेलवर धावणाऱ्या बस पाहता यावर मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. एसटी महामंडळाच्या एकुण खर्चापैकी डिझेलवर होणारा खर्च हा पूर्वी ३४ टक्के होता, सध्याच्या काळात हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. करोनाआधी महामंडळाचे दररोजचे उत्पन्न २१ ते २२ कोटी रुपये होते. करोना आणि त्यानंतर संप यामुळे एसटी अद्यापही सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे महामंडळाचे दररोजचे उत्पन्न १८ कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यातच कर्मचाऱ्यांबरोबर वेतन करार, सरकारकडचे थकीत अनुदान या सर्वामुळे एसटीचा तोटा गेल्या काही वर्षांत वाढतच गेला.

म्हणूनच एसटी महामंडळाने ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यातही नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी एक हजार बस या सीएनजीसाठी परिवर्तित केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती पूर्ण झाली असून एका कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. येत्या एका वर्षांत या बस परिवर्तित होतील, असेही ते म्हणाले. यासाठी १४० कोटी रुपये खर्च येणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात डिझेलवरील खर्चाची बचत होईल. सीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात सीएनजी बस चालवण्याचे नियोजन आहे.

पाच हजार कंत्राटी चालक भरतीला मंजुरी

एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक टप्प्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे.

एलएनजी प्रकल्प रखडला:

डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोटय़ात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षांकाठी एक हजार कोटींचा फायदा होणार होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पावर नुसतीच चर्चा झाली. या कामासाठी एका कंपनीची नियुक्तीही केली. परंतु त्यासाठी लागणारा खर्च व अन्य मुद्दय़ांवर या कंपनीशी चर्चाच सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. त्याआधी सीएनजीत परिवर्तित करण्याच्या कामाला सुरुवात होत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One thousand st buses converted to cng during the year zws

Next Story
खासगी शाळांमध्ये मोफत लस; लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिबिरे घेण्याचा पालिकेचा विचार 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी