बँक खातेदारांच्या पैशांवर ऑनलाइन सट्टा ; बँकेच्या उपव्यवस्थापकाचे कृत्य

आरोपीने स्वत:च्या दोन मोबाइल क्रमांकांचा वापर केला आहे.

मुंबई : बँक ग्राहकांनी विश्वासाने जमा केलेले एक कोटी ८५ लाख रुपये दादर येथील खासगी बँकेच्या शाखा उपव्यवस्थापकाने ऑनलाइन सट्टय़ावर उडवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने खोटय़ा व्यवहाराच्या नोंदी करून सट्टेबाजांच्या नऊ बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष तपासणीत नोंदीपेक्षा रोख कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी  शाखा उपव्यवस्थापकाचे बिंग फुटले.

बँकेचे विभागीय प्रमुख राजीव लंगर यांनी या प्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी बँकेच्या उप शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो २०१२ पासून बँकेत कार्यरत आहेत. वांद्रे येथील बँकेच्या चलन तपासणी विभागाने दादर शाखेत दोन कोटी पाच लाख १६ हजार रुपये एवढी रोख रक्कम का ठेवली आहे? याबाबत विचारणार केली होती. त्यावर तपासणी केली असता बँकेत केवळ २९ लाख १६ हजार एवढीच रोख रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार लंगर हे ६ नोव्हेंबर, २०२१ रोजी बँकेच्या दादर शाखेत गेले असता त्यांना तेथील शाखा व्यवस्थापकाने भेटून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आली.

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण विश्वासात घेतले असता त्याने बँकेतील पैसे सट्टेबाजीत उडवल्याचे सांगितले. त्याने ते पैसे सट्टेबाजांच्या तीन चालू व इतर सहा खात्यांमध्ये जमा केल्याचे सांगितले. त्यासाठी आरोपीने स्वत:च्या दोन मोबाइल क्रमांकांचा वापर केला आहे. त्याने डायमोंडेक्च डॉट कॉम व डेल्टाईक्च डॉट कॉम या संकेतस्थळांवर हा सट्टा खेळला.

एम. के. ऑनलाइन फॅमिली ग्रुप या टेलिग्राम ग्रुपद्वारे सट्टेबाजीशी संबंधित संकेतस्थळ व अ‍ॅप्लिकेशनची माहिती झाल्याचे त्याने सांगितले. हा गैरप्रकार करताना आरोपीने नऊ बँक खात्यांमध्ये रोख रक्कम जमा केल्याच्या खोटय़ा नोंदी केल्या. त्यासाठी कॅश बॅलन्स रजिस्टर व रोख अहवालामध्ये खोटय़ा नोंदी केल्या. त्यामुळे ही रक्कम कागदोपत्री दिसत होती. प्रत्यक्षात ती रक्कम बँकेकडे उपलब्ध नव्हती. या प्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Online betting on bank account holders money by deputy manager zws

Next Story
मिठागरांवरील बांधकाम योजना बासनात; ‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावित आराखड्याला आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांचा विरोध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी