सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून नव्या प्रणालीची चाचणी

मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पातील घरांची नोंदणी १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी अत्याधुनिक अशी संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे तसेच नियमावली तयार करण्याचे काम नोंदणी व मुद्रांक विभागाकडून वेगात सुरू असून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून या प्रणालीच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून महरेरा नोंदणीकृत प्रकल्पातील सरसकट सर्व घरांची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन नोंदणीचा प्रयोग करण्यात आला होता; याअंतर्गत महारेरा नोंदणीकृत ३५० प्रकल्पांतील २००० घरांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.

घरांच्या करारनाम्यांच्या नोंदणीसाठी घरखरेदीदारांना निबंधकाच्या कार्यालयात येण्याची गरज पडू नये यादृष्टीने राज्य सरकारने ऑनलाइन नोंदणीचा पर्याय स्वीकारला आहे. महारेराकडे नोंदणी असलेल्या गृहप्रकल्पांतील विक्री झालेल्या घरांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यात घरांची ऑनलाइन नोंदणी सुरू होईल अशी घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकसत्ता’ च्या ‘रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’ मध्ये सर्वप्रथम केली होती. या घोषणेनुसार १ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर यांनी दिली.

टाळेबंदीत प्रयोगिक तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीने घरांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. यासाठी वापरण्यात येत असलेल्या संगणकीय प्रणालीत (सॉफ्टवेअर) अनेक त्रुटी आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणावर बदल करण्याची गरज होती. त्यातही महारेरा प्रकल्पातील पहिल्या विक्रीतील सरसकट सर्व घरांची नोंदणी यापुढे करायची आहे. त्यामुळे नवीन आणि अत्याधुनिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. दिवसाला अधिकाधिक घरांची ऑनलाइन नोंदणी कोणताही अडथळा न येता करता यावी अशी ही प्रणाली असेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी ऑनलाइन नोंदणी पद्धतीसाठी निश्चित अशी नियमावलीही गरजेची आहे. त्यामुळे नियमावलीही तयार करण्यात येत असल्याचेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले. नव्या प्रणालीच्या चाचणीला सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात सुरुवात होईल. त्यातील त्रुटी पडताळून १ ऑक्टोबरला ऑनलाइन नोंदणी सुरू होईल असेही ते म्हणाले.

पुनर्विक्रीसाठी कार्यालयफेरी अनिवार्य..

१ ऑक्टोबरपासून महारेराकडे नोंदणी असलेल्या प्रकल्पांतील पहिल्या विक्रीतील घरांचीच ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या प्रकल्पांतील पुनर्विक्री वा इतर कोणत्याही पुनर्विक्रीच्या घरांची नोंदणी ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. म्हणजे यासाठी निबंधकाच्या कार्यालयात यावे लागेल असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.