कोकण रेल्वेवरील तिकीट तपासनीसाकडून ऑनलाइन दंडवसूली करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे ‘कॅश’सह ‘कॅशलेस’ दंड आकारणी केली जाते. याच धर्तीवर मध्य रेल्वेवरील तिकीट तपासनीसही ऑनलाइन दंडवसूली सुरू करणार आहेत.रेेल्वेचे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आणि रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी तिकीट तपासणीसांचे पथक स्थानकात तैनात असते. तसेच, एक्स्प्रेस, लोकलमध्ये देखील तिकीट तपासणीसांचे भरारी पथक काम करत असते. अशावेळी विनातिकीट प्रवाशांकडून दंड आकारणी करताना ऑनलाइन रक्कम भरता यावी, यासाठी मध्य रेल्वेद्वारे मोबाइल ॲपची निर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच हे ॲप प्रत्येक तिकिट तपासणीसाकडे दिसून येईल, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे तिकिट तपासनीसांनी दिली.
हेही वाचा >>>चिमुरड्यांच्या शिक्षणाच्या तळमळीला मुख्यमंत्र्यांची साद ! तराफ्याचा जीवघेणा प्रवास थांबवून केली बोटीची व्यवस्था…
तिकीट तपासनीसांना त्यांच्या वैयक्तिक खात्यात दंडाची रक्कम घेण्यास मनाई आहे. त्यामुळे स्वतंत्र ॲप तयार करण्यात येत आहे. त्या माध्यमातून रेल्वेच्या संबंधित बॅक खात्यात दंडाची रक्कम भरता येणार आहे.सध्या मध्य रेल्वेमध्ये १ हजार ४०० तिकीट तपासणीस असून यापैकी उपनगरीय स्थानकात ८०० तिकिट तपासणीस आहेत. विना तिकीट प्रवाशाकडे दंडाची रोख रक्कम नसल्यास, सध्या तिकीट तपासणीस स्वतःच्या खात्यात दंडाची रक्कम स्वीकारतात. तसेच, दंडाच्या रक्कमेची पावती प्रवाशाला दिली जाते. त्यानंतर तिकीट तपासनीसांकडून दंडाची रक्कम रेल्वे विभागात जमा केली जाते.