लोणावळा येथे बंगला दोन दिवसांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या नावाखाली ऑनलाईन रक्कम स्वीकारून महिलेची फसवणुक केल्याचा प्रकार दहिसर येथे घडला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे. आकाश रुपकुमार जाधवानी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा >>>मुंबई : डाळी, कडधान्ये शंभरीपार; होळीपर्यंत जैसे थे परिस्थिती
३२ वर्षांची तक्रारदार महिला दहिसर येथे राहते. ती तिच्या कुटुंबियांसोबत ३१ डिसेंबरला लोणावळा येथे फिरण्यासाठी जाणार होती. याचदरम्यान तिला लोणावळा येथील एका बंगल्याची जाहिरात दिसली होती. तिने जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून दोन दिवसांसाठी बंगला भाड्याने घेण्याबाबत विचारणा केली होती. यावेळी समोरील व्यक्तीने तिला दोन दिवसांसाठी सव्वालाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने त्याला बंगल्याचे पैसे ऑनलाईन यंत्रणेद्वारे पाठवले. काही दिवसांनी तिला या व्यक्तीने दूरध्वनी करुन बंगल्यातील तरण तलावात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना आता बंगला भाड्याने देता येणार नाही. त्यांचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, असे सांगितले. मात्र एक महिना उलटूनही त्याने भाड्यापोटी दिलेले पैसे परत केले नाहीत. नंतर त्याने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता.
फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच तिने दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी मोबाईल सीडीआर आणि तांत्रिक माहितीवरून आकाश जाधवानी या आरोपीस ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. आकाशने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.