मुंबई : मुंबई विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था, संलग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालये व स्वायत्त महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या (पोस्ट ग्रॅज्युएशन – मास्टर्स) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गतच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नावनोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बुधवार, १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी आणि अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तर २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. गुणवत्ता यादी ही संबंधित महाविद्यालयामार्फत व विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांद्वारे जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा >>> सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

विद्यार्थ्यांना http://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे. ‘एखाद्या विद्यार्थ्यास काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी, अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी या उद्देशाने ही मुदतवाढ दिली आहे’, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> अतिवृष्टीमध्ये बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता; पावसाचे मोजमाप करण्यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया

विद्यार्थ्यांना १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी आणि अर्ज सादर करणे अनिवार्य असेल. त्यानंतर २० जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित विभागामार्फत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होईल. २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना २५ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत तक्रार नोंदविता येईल आणि २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश शुल्क भरायचे आहे. तसेच पहिल्या गुणवत्ता यादीनंतर १ जुलैपासून तासिकांना सुरुवात होईल. त्यानंतर २ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. दुसऱ्या गुणवत्ता यादीअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश शुल्क भरायचे आहे.