मुंबई : राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२६ सत्र २ साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २५ फेब्रुवारी रोजी ९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. सत्र २ ची परीक्षा २ ते ९ एप्रिल दरम्यान होण्याची शक्यता आहे.

देशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) तसेच केंद्र सरकारद्वारे वित्तपुरवठा करण्यात येणाऱ्या इतर तांत्रिक संस्थांमधील पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यासाठी जेईई (मुख्य) २०२६ परीक्षा ही महत्त्वपूर्ण समजली जाते. नुकतीच जेईई (मुख्य) २०२६ सत्र १ ची परीक्षा झाली असून तिचा निकाल १२ फेब्रुवारी जाहीर होणार आहे. त्याचपूर्वी एनटीएकडून सत्र २ च्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २५ फेब्रुवारीला रात्री ९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत नोंदणी शुल्क भरता येणार आहे. सत्र २ ची परीक्षा २ ते ९ एप्रिल दरम्यान होण्याची शक्यता आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी जेईई (मुख्य) २०२६ सत्र १ साठी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना सत्र २ मध्येही बसण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना सत्र १ साठी दिलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे. त्यानंतर सत्र २ साठी लागू असलेले परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा, परीक्षेचे माध्यम, परीक्षा केंद्रासाठी शहरांची निवड करावी लागणार आहे.

परीक्षेच्या शहराबाबत आगाऊ सूचना, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या तारखा तसेच निकाल जाहीर करण्याच्या तारखा योग्य वेळी जेईई (मुख्य) च्या पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच अर्जामधील दुरुस्तीबाबतचा कालावधी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्जामध्ये भरलेली माहिती, अपलोड केलेली कागदपत्रे, छायाचित्रे आणि स्वाक्षरी यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवारांची राहणार असून अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह सादर करण्यात आलेले अर्ज नाकारले जातील, असा इशाराही राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दिला आहे. परीक्षा केंद्र, तारीख आणि वेळ यासंबंधीची माहिती प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एकपेक्षा अधिक अर्ज केल्यास होणार कारवाई

उमेदवारांना एकापेक्षा अधिक अर्ज फॉर्म भरण्यास परवानगी नाही. एखाद्या उमेदवाराकडे एकापेक्षा अधिक अर्ज क्रमांक आढळल्यास, त्यास अनुचित मार्गांचा वापर म्हणून गणले जाईल आणि अशा उमेदवारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क

जेईई (मुख्य) २०२६ साठी अर्ज करताना कोणत्याही उमेदवारास अडचण आल्यास, त्यांनी ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७०० या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा jeemain@nta.ac.in आणि mailto:jeemain@nta.ac.in या ई-मेलवर संपर्क करावा. तसेच उमेदवारांनी एनटीएची अधिकृत संकेतस्थळे http://www.nta.ac.in आणि http: //www.nta.ac.in आणि https: //jeemain.nta.nic.in व https: //jeemain.nta.nic.in यांना भेट द्यावी, असे आवाहन एनटीएकडून करण्यात आले आहे.