मुंबई : राज्यात काही नशेच्या औषधांची ऑनलाईन विक्री होत आहे. संबंधित औषधे सहजपणे उपलब्ध होत आहेत. या प्रकरणी नऊ ऑनलाईन पेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

अशोकराव माने, संतोष दानवे, रोहित पाटील, विक्रम पाचपुते आदींनी या बाबतचा प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यांना झिरवळ यांनी दिलेल्या लिखित उत्तरात नशेच्या औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्याची कबुली दिली.

मद्रास उच्च न्यायालयाने परवानाधारक औषध विक्रेत्यांमार्फत ऑनलाईन औषध विक्री करू शकतात, असे आपल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यात ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. अन्य औषधांबरोबरच नशेच्या औषधांची ऑनलाइन विक्री होत असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. संबंधित औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. राष्ट्रीय आवश्यक औषध सूचीमधील ३८४ औषधांच्या किंमती निर्धारीत केल्या आहेत. या औषधांच्या अधिकतम मुल्यात (एमआरपी) वार्षित दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करता येत नाही. औषधांच्या किंमतीवर देण्यात येणारी सवलत औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यात येत नाही. नियमबाह्य ऑनलाईन विक्री बाबत नऊ परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहितीही झिरवाळ यांनी दिली.