मुंबई : औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीच्या निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्यापैकी फक्त ४८ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यावरून तिसऱ्या फेरीला विद्यार्थ्यांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या फेरीसाठी ६ हजार ९२१ पैकी फक्त ३ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीनंतर ४६ हजार १०९ जागांपैकी २८ हजार ४१९ जागा भरल्या असून, १७ हजार ६९० जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त राहण्याचे हे प्रमाण ४८ टक्के आहे.

औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी फक्त १६ हजार ६७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीत ही संख्या निम्म्यावर आली. दुसऱ्या फेरीमध्ये ८ हजार १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीआधी प्रथम वर्षासाठी प्रवेश बंदी घालण्यात आलेल्या १८ महाविद्यालयांपैकी १३ महाविद्यालयांवरील बंदी उठवण्यात आली. त्यामुळे सुमारे ८५० जागांची भर पडली होती. तिसऱ्या फेरीआधीही भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरित महाविद्यालयांवरील प्रवेश बंदीही मागे घेतल्याने तिसऱ्या फेरीतही जागा वाढल्या. तिसऱ्या फेरीत ६९२१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. मात्र त्यातील फक्त ३ हजार ६१५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. उरलेल्या ३ हजार ३१६ जागा रिक्तच राहिल्या. आता तिसऱ्या फेरीनंतर एकूण उपलब्ध असलेल्या ४६ हजार १०९ जागांपैकी १७ हजार ६९० जागा रिक्त आहेत. हे प्रमाण ४८ टक्के एवढे असल्याने तिसऱ्या फेरीनंतर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अधिक जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या फेरीपूर्वी बंदी घातलेल्या महाविद्यालयांवरील बंदी उठविण्यात आली असली तरी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांना लाभ झालेला नाही. परिणामी, त्यांच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाला विद्यार्थ्यांनी अल्प प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम या महाविद्यालयांवर झाला आहे. त्यामुळे सीईटी कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या चौथ्या आणि संस्थास्तरीय फेरीवर या महाविद्यालयांची भिस्त असणार आहे. दरवर्षी पीसीआयकडून महाविद्यालयांना मान्यता देण्यास विलंब होत असल्याने त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाही ३० सप्टेंबरपर्यंत मान्यता प्रक्रिया सुरू राहिल्याने सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागली होती.