झोपडपट्टीत ५७ टक्केच लसीकरण ; गृहनिर्माण संकुलांच्या तुलनेत मोठी तफावत

प्रामुख्याने या भागांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करून घराजवळ ही सुविधा उपलब्ध करून दिली

सेरो सर्वेक्षणातील निरीक्षणे

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मुंबईत पहिल्या मात्रेचे लसीकरण ९७ टक्के झाले असले तरी पालिकेने नुकत्याच केलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार झोपडपट्टी भागात लसीकरणाचे प्रमाण ५७ टक्के आहे, तर या तुलनेत गृहनिर्माण संकुलांमध्ये ७४ टक्के लसीकरण झाले आहे. गृहनिर्माण संकुल आणि झोपडपट्टी या दोन्ही भागांत लसीकरणामध्ये मोठी तफावत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

महापालिकेने केलेल्या पाचव्या सेरो सर्वेक्षणानुसार मुंबईतील ८७ टक्के नागरिकांमध्ये प्रतििपडे आढळली. यात झोपडपट्टी भागांत ८७ टक्के तर गृहनिर्माण संकुलांमध्ये ८६ टक्के नागरिक बाधित झाल्याचे आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८,६७४ नागरिकांपैकी ५,६६० नागरिकांचे म्हणजेच ६५ टक्के लसीकरण झाले होते, तर अन्य ३५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले नसल्याचे आढळले. यात झोपडपट्टी आणि गृहनिर्माण संकुले या दोन्ही भागांचे समावेश केलेला होता.

झोपडपट्टीच्या तुलनेत गृहनिर्माण संकुलांमध्ये लसीकरण जास्त प्रमाणात झाल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. लसीकरण झालेल्या ५,६६० नागरिकांपैकी २,६५१ नागरिक झोपडपट्टीतील तर ३,००९ हे गृहनिर्माण संकुलांमधील होते. झोपडपट्टीमध्ये ५७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले होते, तर गृहनिर्माण संकुलांमध्ये हे प्रमाण ७४ टक्के आहे. झोपडपट्टीमध्ये प्रतििपडाचे प्रमाण गृहनिर्माण संकुलाच्या तुलनेत अधिक असले तरी या भागांमध्ये लसीकरण मात्र तुलनेने फार कमी प्रमाणात झालेले आहे.

‘सेरोसाठी घेतलेले नमुने हे साधारण तीन महिन्यांपूर्वीचे आहेत. यानंतर पालिकेने झोपडपट्टी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने या भागांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करून घराजवळ ही सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच अगदी दाटीवाटीच्या भागांमध्ये मोबाइल लसीकरण वाहन सेवाही सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सामाजिक उत्तरदायित्वातून प्राप्त झालेल्या लशींपैकी बहुतांश लशींचा साठा झोपडपट्टीच्या लसीकरणासाठी वापरलेला आहे. या भागांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या दिवाळीमध्ये लसीकरणाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. परंतु दिवाळीनंतर पुन्हा जोमाने लसीकरण सुरू केले जाईल’, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील काही भागांत नक्कीच लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. विशेष म्हणजे या भागांमध्ये प्रतििपडांचे प्रमाणही अधिक आहे. परंतु भविष्याच्या दृष्टीने प्रतििपडे अधिक प्रमाणात असली तरी यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात झोपडपट्टीसारख्या ज्या भागांमध्ये लसीकरण झालेले नाही त्यावर भर देणे आवश्यक आहे.

– डॉ. शशांक जोशी, करोना कृती दलाचे सदस्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Only 57 percent vaccination in mumbai slums zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या