Only 6,241 street vendors responded Pradhan Mantri Pathakreta Atmanirbhar Nidhi camp mumbai | Loksatta

‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’च्या शिबिरास केवळ ६,२४१ पथविक्रेत्यांचा प्रतिसाद

मुंबईत सुमारे लाखभर फेरीवाले असून त्यापैकी १५ हजार अधिकृत फेरीवाले आहेत.

‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’च्या शिबिरास केवळ ६,२४१ पथविक्रेत्यांचा प्रतिसाद
संग्रहित छायाचित्र

मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान आत्मनिर्भर निधी’अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजनेची मुंबईत अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेची माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने माहिती व प्रात्यक्षिक शिबिरांचे आयोजन केले आहे. मात्र आतापर्यंत १०१ शिबीरांमध्ये केवळ सहा हजार २४१ पथविक्रेते सहभागी झाले आहेत .मुंबईत सुमारे लाखभर फेरीवाले असून त्यापैकी १५ हजार अधिकृत फेरीवाले आहेत. मात्र अद्याप‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेबाबत फेरीवाल्यांमध्ये जनजागृती झालेली नाही.

मुंबईतील पथविक्रेत्यांना या योजनेची संपूर्ण माहिती व्हावी, त्याचबरोबर सदर योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया कळावी या हेतूने महानगरपालिकेतर्फे २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर माहिती व प्रात्यक्षिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत २४ विभागांमध्ये एकूण १०१ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये सहा हजार २४१ पथविक्रेते सहभागी झाले होते, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.या शिबिरामध्ये पथविक्रेत्यांनी सहभागी होऊन या योजनेची माहिती करुन घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी विभागीय वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 12:08 IST
Next Story
धारावी पुनर्विकासासाठी १५ दिवसात निविदा मागविण्यात येणार – एस.व्ही.आर श्रीनिवास