महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या विरोधात अनेकांनी मोहिमा चालविल्या असल्या तरी उघडपणे अंगावर घेण्याचे टाळले होते. गोपीनाथ मुंडे हे एकमेव नेते होते की त्यांनी पवार यांना उघडपणे आव्हान देण्याचे धाडस केले.
१९९०च्या दशकात पवार यांच्यावर आरोपांची राळच त्यांनी उठविली. पवार संरक्षणमंत्री असताना वादग्रस्त शर्मा बंधू त्यांच्याबरोबर विमानातून येणे किंवा पवार यांचे गुन्हेगारी विश्वासी संबंध असल्याचा आरोप करून मुंडे यांनी खळबळ उडवून दिली होती.  वसईतील २८५ भूखंडांचे प्रकरण मृणालताई गोरे आणि पा. बा. सामंत यांनी काढून पवार यांना अडचणीत आणले होते. पुढे मुंडे हे पवार यांच्या हात धुवून मागे लागले होते. मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने भाजपला आव्हान दिले. मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना गळाला लावून राष्ट्रवादीने मुंडे यांच्यावर कुरघोडी केली होती.  पवार आणि मुंडे यांच्यातील वाद अगदी गेल्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बघायला मिळाला.  अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही पवार विरुद्ध मुंडे चित्र बघायला मिळाले. युतीची सत्ता आल्यास अजित पवार यांना तुरुंगात टाकू, असे मुंडे भाषणांमधून सांगायचे. मुंडे प्रचाराच्या काळात शरद पवार यांचीही खिल्ली उडवायचे. बीडमध्ये राष्ट्रवादीने मुंडे यांच्या विरोधात सारी ताकद पणाला लावली होती.