scorecardresearch

प्रतीक्षानगर आगारासाठी वर्षभराचे अवघे १५०० रुपये भाडे; खासगी कंत्राटदारासाठी ‘बेस्ट’चा निर्णय

बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात आहे. तोटा कमी करण्यासाठी दैनंदिन खर्च कमी करण्याबरोबरच इंधन बचतीसह अन्य उपाययोजना उपक्रमाकडून केल्या जात आहेत.

खासगी कंत्राटदारासाठी ‘बेस्ट’चा निर्णय

मुंबई : बेस्ट उपक्रमाकडून स्वमालकीच्या बस घेण्याऐवजी खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर बस घेण्यात येणाऱ्या बस उभ्या करण्यासाठी, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतीक्षानगर आगाराची जागा बस पुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक बसमागे वर्षांला एक रुपया भाडे आकारण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात आहे. तोटा कमी करण्यासाठी दैनंदिन खर्च कमी करण्याबरोबरच इंधन बचतीसह अन्य उपाययोजना उपक्रमाकडून केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. उपक्रमाने स्वमालकीच्या बस दाखल कराव्या अशी मागणी संघटनेने सातत्याने केली आहे. तरीही भाडेतत्त्वावरील बस ताफ्यात दाखल करणे सुरूच ठेवले असून या बस एकाच आगारात उभ्या राहाव्यात, त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसह अन्य कामांसाठी उपक्रमाने भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला संपूर्ण आगारच देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकीकडे आर्थिक कारणे पुढे केली जात असताना बेस्टची जागा मात्र एका बसमागे वर्षांला फक्त एक रुपया भाडे आकारून देण्यात येणार आहे. म्हणजेच वर्षांकाठी साधारण पंधराशे रुपये भाडे बेस्टला मिळेल. 

बेस्टच्या प्रतीक्षानगर आगारातील बस आणि कर्मचारी अन्य आगारांत स्थलांतरित करण्यात आले आहेत. या आगारातील ३४ स्वमालकीच्या बस आणिक आगारात स्थलांतरित केल्या असून ७६ चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणिक आगारसह दुसऱ्या आगारात करण्यात आल्या आहेत. तेथून सुटणाऱ्या बसचे मार्ग बदलल्याने प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. या निर्णयाला      बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनने विरोध दर्शवला आहे.

 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे, बस अन्यत्र स्थलांतर करणे यातून प्रतीक्षानगर येथील उपक्रमाचे आगार बेकायदा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे तात्काळ थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याबरोबरच न्यायालयीन लढाही देऊ असा असा इशारा बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३,४६० बस आहेत. यातील स्वमालकीच्या १,९०६ आणि भाडेतत्त्वावरील १,५५४ बस आहेत.

तीन आगार खासगी कंत्राटदाराला आंदण?

‘आपली बेस्ट आपल्यासाठीच’ या संघटनेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनीही प्रतीक्षानगर बस आगाराबाबत बेस्ट उपक्रमाने घेतलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. हा खासगीकरणाचाच डाव असल्याची टीका त्यांनी केली आहे. या आगारापाठोपाठ ओशिवरा, मालवणी, सांताक्रूझ आगारातही अशीच अंमलबजावणी होऊ शकते, अशी भीतीही शेलटकर यांनी व्यक्त केली.

बेस्टचा प्रतीक्षानगर आगार बंद करण्याचा कोणताही निर्णय नाही. या आगारातून बससेवा देण्याचे काम हे खासगी कंत्राटदाराला दिले आहे. या बस खासगी कंत्राटदाराच्याच आहेत. त्यामुळे प्रतीक्षानगर आगारात उभ्या असलेल्या बेस्टच्या ३४ बस आणिक आगारात हलवण्यात आल्या आहेत. तर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही अन्य आगारात केली आहे. – मनोज वराडे, उप-जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Only rs1500 per year for pratikshanagar depot akp