सर्वेक्षणानंतर म्हाडाकडून यादी जाहीर
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणानंतर ‘म्हाडा’ने यंदा १६ इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागील वर्षीच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील नऊ इमारतींचाही या १६ इमारतींमध्ये समावेश आहे. त्यामुळे अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना हलवून त्या रिकाम्या करण्यात ‘म्हाडा’ हतबल असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत सध्या १४ हजार ९१० उपकरप्राप्त इमारती उभ्या आहेत. मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळय़ापूर्वी जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. शनिवारी मंडळाचे सभापती प्रसाद लाड आाणि मुख्याधिकारी मोहन ठोंबरे यांनी १६ इमारतींची यादी जाहीर केली. त्यात मागच्या वर्षी नऊ इमारतींचा समावेश असून नव्याने सात इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.
या इमारतींमध्ये ४७८ निवासी आणि २०५ अनिवासी असे एकूण ६८३ भाडेकरू आहेत. पैकी दोन इमारतींना पुनर्विकासाची परवानगी दिल्याने त्यातील ११७ निवासी आणि २७ अनिवासी अशा १४४ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची आहे. तर बोटावाला चाळ सी व डी या दोन इमारतींना समूह विकासाअंतर्गत राज्य सरकारने पुनर्विकासाची परवानगी दिली आहे. त्यातील १८६ भाडेकरूंच्या पर्यायी निवासाच्या व्यवस्थेचे काम विकासकाने सुरू केले आहे. १७५ रहिवाशांपैकी ८७ जणांनी आपली व्यवस्था केली असून आता केवळ ८८ भाडेकरूंची व्यवस्था संक्रमण शिबिरांत करावी लागेल. मंडळाकडे ४०० संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने त्यांची व्यवस्था करण्यात काहीच अडचण नाही, असे ठोंबरे यांनी सांगितले.
अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांची घर सोडण्याची मानसिकता नाही. त्यामुळे होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी सक्तीने, पोलीस बळाचा वापर करून त्यांना धोकादायक इमारतींमधून बाहेर काढण्याचा पर्याय तपासण्यात येत आहे, असे प्रसाद लाड यांनी नमूद केले.