scorecardresearch

पुरातन वारसा वास्तू सफर मध्यरात्रीपर्यंत ; बेस्ट उपक्रमाचा निर्णय

दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसमधून पर्यटन सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुंबई: पर्यटकांचा वाढत्या प्रतिसादानंतर बेस्ट उपक्रमाने पुरातन वास्तू वारसा सफर बस सेवा मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १७ मार्चपासून करण्यात येणार आहे. ही बस सायंकाळी ५ पासून पर्यटकांच्या सेवेत रुजू होते.

दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसमधून पर्यटन सेवा सुरू करण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बस फेऱ्या शनिवार आणि रविवारी सायंकाळी ६.३० आणि रात्री ८ वाजता

सोडण्यात येतात. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून दुपारी ३ आणि सायंकाळी ५ वाजता दोन अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

२७ नोव्हेंबर २०२१ पासून फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी ९.३० आणि ११ वाजता दोन अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येऊ लागल्या. मात्र वाढलेल्या उकाडय़ामुळे पर्यटन बसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १७ मार्चपासून आठवडय़ातील सर्व दिवस सायंकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत पर्यटन बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

तिकीट विक्री, तसेच अन्य माहितीसाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक येथे संपर्क साधता येईल. त्याशिवाय बेस्ट उपक्रमाचा टोल फ्री क्रमांक १८००२२७५५० आणि ०२२२४१९०११७ या दूरध्वनी क्रमांकावरही या सेवेविषयी माहिती मिळू शकेल. तसेच तिकीट डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक, गेटवे ऑफ इंडिया येथे आणि बसमध्ये उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Open double decker bus for tourist service till midnight zws

ताज्या बातम्या