Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताची लष्करी ताकद जगासमोर आली. प्रामुख्याने हवाई दलाची, सामरिक क्षमता, तांत्रिक प्रावीण्य आणि संयुक्त कारवाईची ताकद ठळकपणे स्पष्ट झाली, असे प्रतिपादन हवाई दलाचे माजी प्रमुख विवेक राम चौधरी यांनी केले. आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आयोजित संरक्षण परिसंवाद या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे माजी प्रमुख उपस्थित होते.

भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर ७ मे रोजी पहाटे हल्ले केले. तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे ही मोहीम यशस्वी ठरली. या कारवाईनंतर पाकिस्तानने ८ व ९ मे रोजी ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. लष्करी तळांसह नागरी भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिन्ही दलांच्या एकत्रित संरक्षण व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्फळ ठरले.

भारतात कोणतीही हानी झाली नाही. मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून लष्करी तळांवर हल्ले सुरू झाल्यानंतर भारताने ९ व १० मे रोजी त्यांच्या हवाई तळांवर जोरदार प्रतिहल्ला केला. अत्यंत अचूक आणि प्रभावी कारवाईमुळे पाकिस्तानचे प्रमुख हवाई तळ निष्क्रिय झाले आणि त्यानंतर पाकिस्तानने माघार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबाबत भाष्य करताना त्यांनी ‘आयएसआर’ प्रणालीचे महत्त्व अधोरेखित केले. सिग्नल इंटेलिजन्स, उपग्रह माहिती, ड्रोन, मानवी गुप्तचर आणि खुल्या स्रोतांमधील माहिती एकत्रित केल्यामुळे लक्ष्यांची अचूक ओळख पटली. बॉम्ब डॅमेज अस्सेसमेंटसाठी प्रत्यक्ष छायाचित्रे आणि शस्त्रांमधून मिळणारा थेट फीड वापरण्यात आला. तसेच भारतीय हवाई दलाची आयएसीसीएस प्रणाली आणि लष्कराचे ‘आकाश’ नेटवर्क एकत्र जोडल्यामुळे शत्रूचे सर्व हल्ले परतवून लावणे शक्य झाले. दीर्घ पल्ल्याच्या अचूक शस्त्रांनी या मोहिमेत निर्णायक भूमिका बजावली. सुखोई-३० विमानातून डागलेल्या स्वदेशी ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राने विशेष लक्ष वेधून घेतले, असे त्यांनी नमूद केले.