मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’ची मोहीम फत्ते करण्याकरिता आवश्यक खासदारांचे संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई मोलाची ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यात शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार फोडाफोडीचे राजकारण रंगात आले असताना पूर्णपणे मौन बाळगून असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान करत धक्का दिला होता. ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री प्रथमच या सर्व घडामोडींवर उघडपणे व्यक्त झाले. कारण ऑपरेशन टायगरचे तर ठरले होते. परंतु, त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत हेच ठरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मौन बाळगले होते.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. परंतु, जानेवारी, २०२६मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर गांभीर्याने विचार सुरू झाला. या आधी खासदार फोडण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान पाच वेळा तरी भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती.

परंतु, खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता. बहुतांश खासदारांची हाती कमळ धरण्याची इच्छा होती, मात्र खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. याकरिता केंद्रीय नेतृत्वाबरोबर फडणवीस यांच्या बैठकाही झाल्या.

शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये यावर काथ्याकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये ऑपरेशन टायगरकरिता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दाखवला. पाच खासदारांना आपल्याकडे वळविण्यात शिंदे यांना यश आले.  त्यावेळी प. बंगालमध्ये तृणमूलचे आमदार-खासदार फोडाफोडीचे राजकारण ऐन भरात होते. भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांच्याकडे विचारणा होऊ लागली. परंतु, खासदारांचे संख्याबळ पाचच्या पुढे जाण्यास तयार नव्हते. अखेर ही जबाबदारी फडणवीस यांच्याकडे दिली. 

राजकीय कारकिर्दीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सहाव्या खासदाराशी संपर्क साधून त्याचे मन वळविले. त्याच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आणि हा तिढा सुटला. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात सूत्रे वेगाने हलली आणि ऑपरेशन टायगर पूर्णत्वाला आले. सहा खासदारांनी दिल्ली गाठत लोकसभा अध्यक्षांना पत्र देत ठाकरे गटाला शेवटचा दणका दिला.