मुंबई : उद्योग क्षेत्राशी सामना करताना सहकार क्षेत्राने काळानुरूप बदल आत्मसात करायला हवेत. संस्था नफ्यात चालण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा असून काळासोबत चळवळ चालण्यासाठी राज्य सहकारी बँके ने पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. तर राज्य बँके च्या प्रगतीमुळे सहकारक्षेत्र समृद्ध होत असून शेवटच्या माणसाला स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम या चळवळीने करावे, अशी सूचना माजी के ंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

 राज्य सहकारी बँके च्या शतकोत्तर दशपूर्तीनिमित्त सहकार चळवळीला दिशा देणारे आणि बँके च्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या वैकुं ठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या तैलचित्रांचे अनावरण समारंभात गडकरी- पवार बोलत होते. या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

ग्रामीण जनतेचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी वैकुंठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजयराव गाडगीळ यांनी प्रतिकू ल परिस्थितीत सहकाराचा मंत्र दिला आणि या चळवळीचा वटवृक्ष झाला. शेती आणि शेतीपूरक उद्योगात सहकार किती महत्त्वाचा आहे हे देशात दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या विकासातून दिसून येते असे सांगून गडकरी म्हणाले, आत्मनिर्भर देशात कृषी क्षेत्राची वाढ महत्त्वाची असून सहकार चळवळीत काळानुरूप बदल घडण्यासाठी राज्य बँके ने पुढाकार घ्यायला हवा. साखर उद्योग चांगल्या प्रकारे चालण्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रिक्षा इथेनॉलवर चालविण्याची सक्ती करावी. यामुळे इथेनॉलला चांगला भाव मिळेल तसेच रिक्षावाल्यांचाही लाभ होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.  बँका, पतसंस्थामध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा असून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणात गुंतवणूक के ल्यास ७ टक्के  परतावा देण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. देशात लवकर पेट्रोल, डिझेलसोबतच इथेनॉल किं वा बायो-डिझेलवरही चालणारे फ्लेक्स फ्लुएल इंजिन बंधनकारक करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी  केला.

राज्याच्या विकासात राज्य बँके चे योगदान मोठे आहे. मध्यंतरी बँके ची परिस्थिती चिंताजनक होती, मात्र प्रशासकांनी बँके ला नफा मिळवून दिला. एवढेच नव्हे तर आता बँक समृद्ध होत असून त्यातून सहकाराची समृद्धी होत असल्याचे सांगत शरद पवार यांनी राज्यातील सहकार चळवळीच्या प्रगतीचा आलेख मांडला.