मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाने १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदारयादी संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना संबंधित विधानसभा मतदारयादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे, तर मतदारयादीतील दुरुस्ती, दावे आणि आक्षेप निकाली काढून ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हीच यादी मुंबई महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य राहणार आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक विभागातर्फे  मतदार नोंदणी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार म्हणून नोंदवावे आणि पालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करून कर्तव्य बजावून मतदानाची सरासरी टक्केवारी वाढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले.

या कार्यक्रमाअंतर्गत पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत मुंबईतील प्रमुख ठिकाणी तसेच प्रमुख रेल्वे स्थानके, दवाखाने, उद्याने, विमानतळ इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी मतदारयादी संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स लावण्यात येत आहेत. विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करून त्यांना कल्पना देण्यात येणार आहे. महापौरांमार्फत महानगरपालिकेच्या सभागृहात

२२७ नगरसेवकांना मतदारयादी नोंदणी कार्यक्रमाची माहिती होईल, असा संदेश प्रसारित

करण्यात येणार आहे. तर पालिकेच्या विविध कर देयकांवर तसेच बेस्ट, दूरध्वनी व महानगर गॅस यांच्या देयकांवर घोषवाक्य प्रकाशित करण्यात येत आहे. विविध माध्यमांतून मतदार नोंदणीसाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.

कुलगुरू तसेच शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक महाविद्यालयात व शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करून या कार्यक्रमाचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोहचविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. करोनाचे सर्व नियम पाळून पालिकेकडून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. करोनाच्या पाश्र्वाभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन प्रक्रियाला प्राधान्य देत नावनोंदणी, दुरुस्ती करावी असेही आवाहन पालिकेने केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in आणि  www.ceo.maharashtra.nic.in   या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी वा दुरुस्ती करता येईल. तसेच १९५० या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक ती चौकशी करता येईल.