मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाविरुद्ध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. राज्य सरकार बदलल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नवी नियुक्ती केली जावी, असा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशास रहाटकर यांनी विरोध दर्शवला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा हा आदेश राजकीय स्वरूपाचा व अनावश्यक असल्याचे सांगत, रहाटकर यांनी आयोगाच्या संविधानिक अध्यक्षपदास राज्य सरकारचा विशेष अधिकार लागू होत नसल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश १९९३ च्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायद्याच्या एकदम विपरीत असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले आहे.

एका जनहितार्थ याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने सरकार बदलल्याने रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा व ५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षाची नियुक्ती करावी असा आदेश दिला होता. हा आदेश आयोगाच्या कायद्यातील तरतूदींच्या विरोधातील असल्याचे सांगत, रहाटकर यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.