scorecardresearch

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कास्टिंग यार्डला विरोध; आंदोलनाचा इशारा

एकीकडे वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम रखडले आहे. तर आता दुसरीकडे भाजपने या प्रकल्पातील कास्टिंग यार्डला विरोध दर्शविला आहे.

मुंबई : एकीकडे वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम रखडले आहे. तर आता दुसरीकडे भाजपने या प्रकल्पातील कास्टिंग यार्डला विरोध दर्शविला आहे. वांद्रे रेक्लमेशन येथील मुंबई महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव असलेल्या जागेवर कास्टिंग यार्ड उभारण्यात येत आहे. या कास्टिंग यार्डमुळे परिसरात पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करीत भाजपच्या स्थानिक आमदारांनी कास्टिंग यार्डला विरोध केला आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला याबाबत एक निवेदन दिले आहे. तसेच प्रस्तावित कास्टिंग यार्ड रद्द करण्याच्या मागणीसाठी लवकरच मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
वरळी – वांद्रे सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्यात येत आहे. सात हजार कोटी रुपये खर्च करून १७.१७ किमी लांबीचा वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू बांधण्याचे काम एमएसआरडीसी करीत आहे. या प्रकल्पाचे काम २०१९ पासून सुरू झाले होते. मात्र, आतापर्यंत प्रकल्पाचे केवळ अडीच टक्केच काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट २०२१ पासून प्रकल्पाचे काम बंद होते. आता मात्र या प्रकल्पाच्या कामातील सर्व अडचणी एमएसआरडीसीने दूर केल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रकल्पाच्या बांधकामाला नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. कंत्राटदाराची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. असे असतानाच भाजपने या प्रकल्पातील कास्टिंग यार्डला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या प्रकल्पासमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
या कामासाठी वांद्रे रेक्लमेशन येथे वांद्रे-वरळी टोलनाक्यालगत डाव्या बाजूच्या जागेवर कािस्टग यार्ड उभारण्यात आले आहे. शेलार यांनी नुकतीच एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्थानिक रहिवासी आणि आपला या कास्टिंग यार्डला विरोध असल्याचे कळविले. यासंबंधीचे निवेदनही एमएसआरडीसीला दिले आहे. ही जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव आहे. असे असताना येथे कास्टिंग यार्ड उभारल्यास महत्त्वाच्या अशा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीस किमान पाच वर्ष विलंब होईल. तसेच या कास्टिंग यार्डमधील कामाचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असून येथील पर्यावरणाला धक्का बसत आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कंत्राटदाराविरोधात कारवाईची मागणी
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पातील ‘अपको अस्टाल्डी’ या कंत्राटदार कंपनीविरोधात कारवाई करण्याचीही मागणी शेलार यांनी केली आहे. या कंपनीने कामादरम्यान निष्काळजीपणा केल्याने मागील आठवडय़ात सांताक्रूझ पश्चिम परिसरातील वीजपुरवठा पाच तास खंडित झाला होता. कंत्राटदाराने मुख्य वीज वाहिनी (केबल) कापल्याने वीज खंडित झाली आणि त्याचा फटका नागरिकांना बसला. त्यामुळे या कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opposition casting yard bandra versova sea bridge warning agitation mumbai municipal corporation amy

ताज्या बातम्या