राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने आज दुपारी 'मी पण गांधी' ही पदयात्रा आयोजित केली आहे. परंतु, मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्रा आडवली. त्यानंतर पोलीस आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे. आमदार अबू आझमी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या धोरणांविरोधात इंडिया आघाडीने 'मी पण गांधी' ही पदयात्रा काढली. पदयात्रा मुंबईतल्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचल्यावर पोलीस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते पुढे चालू लागले. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने प्रसिद्ध केलं आहे. आघाडीचे कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया आघाडीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, हे शांतता क्षेत्र (silence zone) असल्याने तसेच उच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्बंध असल्याचे कारण देत या पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलिसांनी रीगल सिनेमा ते गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रेची परवानगी दिली होती. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, संजय निरुपम या पदयात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, या पदयात्रेवरील कारवाईनंतर आमदार वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने शांततेच्या मार्गाने एक पदयात्रा काढली होती. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देणं हा या पदयात्रेचा एकमेव उद्देश होता. परतु, गांधी जयंतीच्या दिवशीच आमच्या पदयात्रेवर कारवाई करण्यात आली. आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत. मला सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार तुम्ही का हिरावून घेत आहात?