मुंबई : बुकी अनिल जयसिंघानी हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून त्याची मुलगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट घरात कशी येऊ शकते, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
समृद्धी महामार्गाच्या कामात १ हजार २३८ कोटी रुपयांचा गौण खनिज स्वामित्वधन गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी पवार यांनी केली. विरोधकांना तुरुंगात टाकण्याची नवी प्रथा सत्ताधाऱ्यांनी सुरू केली असून ‘फोडा, नाही तर झोडा’ ही राजनीती फार काळ टिकणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.
फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना लाच देण्याचा प्रयत्न बुकी जयसिंघानी याच्या मुलीने केल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करून पवार म्हणाले, फडणवीस हे याआधी पाच वर्षे आणि आताही गृहमंत्री असताना आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची मुलगी त्यांच्या घरात कशी येते?
भाजप कार्यकर्त्यांनाही फटका
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जात आहेत. पण, ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची नावे पुढे आली. वागळे इस्टेट पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा जाहीर आरोप भाजप आमदार संजय केळकर व अॅड. निरंजन डावखरे यांनी केला होता. याकडे पवार यांनी लक्ष वेधले.