मुंबई: सहा खासदारांपाठोपाठ आमदारांमध्ये फूट पडणार अशी चर्चा सुरू झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिल्याने त्याचीच चर्चा सुरू झाली. संख्येने कमी असलात तरी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जनेचे प्रश्न मांडताना कुठेही कमी पडू नका, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.
या बैठकीत पक्षफुटीवर कोणतीही चर्चा झाली नाही, राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था, या प्रश्नांवर सरकरला जाब विचारा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी आमदरांना दिला. विधिमंडळाच्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन्ही सभागृहातील कामाकाजाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली.
या बैठकीला उभय सभागृहांचे आमदार उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे यांनी पक्षफुटीवर कोणतीही चर्चा न करता आमदारांना अधिवेशनासाठी कार्यक्रम दिला. अधिवेशनात विरोधकांना बोलू दिले जात नाही, मात्र आपली भूमिका मांडण्यात कमी पडू नका, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. लाडकी बहीण योजनेत ८१ लाख महिला अपात्र ठरल्या, त्यांचा विषयही अधिवेशनात उचलून धरण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या. नीट पेपरफुटी तसेच अन्य परीक्षात होणारी पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आदेश त्यांनी दिले.
हे चार आमदार अनुपस्थित
संजय पोतनीस, सुनील शिंदे, राहुल पाटील, संजय देरकर हे चार आमदार उपस्थित नव्हते. खासदारांपाठोपाठ आमदार फुटणार अस्ल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळेच या आमदारांच्या अनुपस्थितीकडे या नजरेने बघितले जाते. . यापैकी संजय देरकर हे गावी, संजय पोतनीस हे पुण्यात, गेले होते. राहुल पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीत असल्याचा दावा केला. सुनील शिंदे हेही गावी असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नसल्याची माहिती शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
या बैठकीत पक्षफुटीवर कोणतीही चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भर दिला असे सांगताना ज्या फुटलेल्या खासदारांना शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भीती व्यक्त केली. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जाते ते खासदार शिवसेना ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर निवडून आले असताना त्यांना पक्षप्रवेश कसा दिला जातो, असा सवाल जाधव यांनी केला.
