मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरसकट कर्ममाफीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘नको अटी, नको शर्ती; शेतकऱ्यांना हवी कर्जमुक्ती’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’ अशा घोषणा दिल्या. महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन छेडले.
विरोधातील सर्व आमदारांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. हातात बॅनर, पोस्टर आणि घोषणाबाजीने विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार अंबादास दानवे, आमदार वरुण सरदेसाई, आमदार महेश सावंत, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक आमदार उपस्थित होते.
महायुतीने सत्तेत येताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफीसाठी अनेक अटी व शर्ती लादून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. महायुतीचे आमदार सभागृहाच्या दिशेने जात असताना आघाडीच्या आमदारांनी पुन्हा घोषणाबाजी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. लबाड लांडगं ढोंग करतंय…कर्जमाफीचं सोंग करतंय…, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाय…अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
पिण्याच्या पाण्यावर चर्चा करा – नाना पटोले
विधानसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील नद्या, नाले, धरणे आणि तलाव कोरडे पडले असून भूजल पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अनेक गावांमध्ये व शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर सभागृहात सकारात्मक चर्चा घडवून आणली जाईल, असे आश्वासन दिले.
