मुंबई: ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्यावर अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनीही ‘तुम्हाला हवेत का खोके’ असे विरोधकांना प्रत्यमुत्तर दिल्याने विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर काहीकाळ वातावरण तापले होते.  

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक फ़डकवीत घोषणाबाजी केली.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करतानाच विरोधकांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करून सभागृहात येत असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो.’. ‘आले रे आले गद्दार आले’. ‘ईडी सरकार हाय हाय,.स्थगिती सरकार हाय. हाय’. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.  घोषणांनी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. त्यावेळी शिंदे गटाकडूनही तुम्हाला हवेत का असे प्रत्युत्तर देण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर विधान भवनात प्रवेश करीत असताना  ‘सुधीरभाऊंना चांगले खाते न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘आशीष शेलारांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

अतिवृष्टीवर सरकारचे लक्ष- फडणवीस

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत विधानभवन परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांनी विधानसभेतही याच मागणीवरून सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज्यातील अतिवृष्टीवर सरकारचे पूर्ण लक्ष असून मदतीबाबत सविस्तर निवेदन करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काँग्रेसचे नाना पटोले यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करीत गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि इतर भागांत अतिवृष्टीमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शेती उद्धवस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे त्यावर चर्चा करम्ण्याची मागणी केली. त्यावर सरकार या सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक भागांचा दौरा केला आहे. त्यामुळे याप्रश्नी लवकरच राज्य सरकारच्या वतीने सविस्तर निवेदन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.