मुंबई: ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाअंतर्गत ऑरेंज गेट येथील लाॅन्चिंग शाफ्टमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये पहिले मावळा टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) भूगर्भात सोडण्यात आले. त्यानंतर मावळा यंत्राने भुयारीकरणास सुरुवात केली असून पाच महिन्यांच्या कालावधीत २५० मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. हे टीबीएम संपूर्ण भुयारीकरणाचे काम पूर्ण करून सव्वा ते दीड वर्षांनी भूगर्भातून बाहेर येण्याची शक्यता आहे. ३७२० मीटरचे भुयारीकरण

चेंबूर ते सीएसएमटी प्रवास पूर्वमुक्त मार्गामुळे अतिजलद झाला आहे. मात्र मार्गावरून अतिजलद येणार्या वाहनांना पुढे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. तर मरिन ड्राईव्ह, चर्चगेटला जाण्यासाठी बराच वेळ खर्ची करावा लागतो. त्यामुळे पूर्वमूक्त मार्गावरून थेट मरीन ड्राईव्हला अतिजलद पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे.

९.२ किमी लांबीच्या या दुहेरी बोगद्याच्या कामासाठी ९,१५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ऑरेंज गेट येथे लॉन्चिंग शाफ्ट तयार करण्यात आला असून याच लॉन्चिंग शाफ्टमधूनच दोन टीबीएम भूगर्भात सोडून भुयारीकरण केले जाणार आहे. त्यानुसार मावळा हे पहिले टीबीएम ३ डिसेंबर २०२५ रोजी भूगर्भात सोडण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

भुयारीकरणास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत, २६ मार्च २०२६ पर्यंत मावळा टीबीएम यंत्राने ३७२० मीटरपैकी ७० मीटर भुयारीकरण पूर्ण केले होते. तर आता मे २०२६ पर्यंत भुयारीकरण २५० मीटरपर्यंत पोहोचल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तर भुयारीकरण झालेल्या बोगद्यांमध्ये कायमस्वरूपी सेगमेंटल लाइनिंग रिंग्सची उभारणीही पूर्ण करण्यात आली आहे. तर उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याचेही एमएमआरडीएने सांगितले.

मावळा टीबीएम यंत्र भुयारीकरणाचे काम पूर्ण करून सव्वा ते दीड वर्षांनी बाहेर येणार आहे. ऑरेंज गेट लाॅन्चिंग शाफ्टमध्येच येत्या काही दिवसांत दुसरे टीबीएम यंत्र सोडून या टीबीएमअंतर्गतही भुयारीकरणाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार आता कामाला वेग देण्यात आल्याचेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा बोगदा सेवेत दाखल झाल्यास ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह, चर्चगेटला पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे ऑरेंज गेट येथील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.