मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला डिसेंबर २०२५ मध्ये सुरुवात झाली. ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शाफ्टमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये पहिले मावळा टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) सोडण्यात आले. या टीबीएम यंत्राने आतापर्यंत ७० मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. हे टीबीएम संपूर्ण भुयारीकरणाचे काम पूर्ण करून सव्वा ते दीड वर्षांनी भूगर्भातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

पूर्वमुक्त मार्गावरून थेट मरीन ड्राइव्हला अतिजलद पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ९.२ किमी लांबीच्या या दुहेरी बोगद्याच्या कामासाठी ९१५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला दिले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ऑरेंज गेट येथे लॉन्चिंग शाफ्ट तयार करण्यात आला असून याच लॉन्चिंग शाफ्टमधूनच दोन टीबीएम भूगर्भात सोडून भुयारीकरण केले जाणार आहे. त्यानुसार हे टीबीएम ३ डिसेंबर रोजी भूगर्भात सोडण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

भुयारीकरणास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत, २६ मार्च २०२६ पर्यंत मावळा टीबीएम यंत्राने ७० मीटर भुयारीकरण पूर्ण केल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. अवघ्या काही दिवसांतच ३७२० पैकी ७० मीटर भुयारीकरण पूर्ण करून मावळा पुढे मार्गक्रमण करत असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. या टीबीएमद्वारे भुयारीकरण पूर्ण करण्यासाठी आणखी सव्वा ते दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

आरेंज गेट लाॅन्चिंग शाफ्ट येथून एका टीबीएम यंत्राद्वारे भुयारीकरण सुरू असून दुसऱ्या दिशेचे भुयारीकरण करण्यासाठी जर्मनीवरून दुसरे टीबीएम आणण्यात येणार आहे. हे टीबीएम लवकरच मुंबईत दाखल होणार असून या टीबीएमची जोडणी करून तेही भूगर्भात सोडले जाणार आहे.

या दोन्ही टीबीएमद्वारे भुयारीकरणाच्या कामाला वेग देत ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. हा प्रकल्प सेवेत दाखल झाल्यास ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.