मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या भुयारीकरणाला सप्टेंबरमध्ये सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र काही कारणास्त या कामाला विलंब झाला असून आता एमएमआरडीएने भुयारीकरणासाठी डिसेंबरचा मुहूर्त धरला आहे. ऑरेंज गेट येथील लाॅन्चिंग शाफ्टमधून डिसेंबरमध्ये मावळा टीबीएम यंत्र (टनेल बोअरिंग मशीन) एका दिशेच्या भुयारीकरणासाठी भूगर्भात सोडले जाणार आहे. तर दुसऱ्या दिशेच्या भुयारीकरणासाठी ऑरेंज गेट येथील लाॅन्चिंग शाफ्टमधूनच दुसरे टीबीएम यंत्र भूगर्भात सोडले जाणार आहे. मात्र दुसरे टीबीएम जर्मनीवरून भारतात दाखल झाल्यानंतर ते यंत्र भूगर्भात सोडण्यासाठी एप्रिल २०२६ उजाडण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएने चेंबूर – सीएसएमटी प्रवास अतिजलद करण्यासाठी १६.८ किमीचा पूर्व मुक्त मार्ग बांधला. हा मार्ग २०१३ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूर्व मुक्त मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य होत आहे. मात्र चेंबूरहून सीएसएमटीपर्यंत अतिवेगाने आल्यानंतर मरीन ड्राईव्ह, चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, चेंबूर – मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या ९.२ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी ९१५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा मुंबई सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे दुहेरी बोगद्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे पश्चिम उपनगरांकडे जाणे सोपे होणार आहे. एमएमआरडीएने मागील काही महिन्यांपासून एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ऑरेंज गेट येथे लाॅन्चिग शाफ्ट तयार करण्यात आला असून आता डिसेंबरपासून भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

दुहेरी बोगदा प्रकल्पात दोन्ही दिशेने अंदाजे सहा-सहा किमीचे भुयारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑरेंज गेट येथील लाॅन्चिंग शाफ्टमधूनच दोन्ही दिशेच्या भुयारीकरणासाठी टीबीएम यंत्रण सोडले जाणार आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील भुयारीकरणासाठी ‘मावळा’ टीबीएमचा वापर करण्यात आला होता, त्याचचा वापर येथे करण्यात येणार आहे. या टीबीएम यंत्रात काही बदल करून ते भुयारीकरणासाठी सज्ज करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये हे यंत्रण भूगर्भात सोडून भुयारीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. तर दुसऱ्या दिशेच्या भुयारीकरणासाठी जपानवरून टीबीएम यंत्र मुंबईत आणण्यात येणार आहे. ते आल्यानंतर त्याची जोडणी करून ते भूगर्भात सोडण्यासाठी एप्रिल २०२६ उजाडण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. तर संपूर्ण भुयारीकरण पूर्ण करून टीबीएम यंत्र बाहेर पडण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मुंबईकरांना बराचकाळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाला वेग देण्याचे निर्देश नुकतेच एका बैठकीत दिले होते. त्यामुळे आता एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेऊन भुयारीकरणाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये हे काम सुरू होईल.