scorecardresearch

प्रवीण दरेकर यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश; पोलिसांनी उत्तर दाखल करण्यास वेळ मागितल्याने तूर्त दिलासा

मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाचे मजूरह्ण असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची आणि अटकेपासून दिलासा मागणारी याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली.

बोगस मजूर प्रकरण

मुंबई : मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाचे मजूरह्ण असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची आणि अटकेपासून दिलासा मागणारी याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. सरकारी वकिलांनी अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने सोमवारपर्यंत दरेकर यांना अटकेपासून दिलासा दिला. 

माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची आणि दरेकर यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र दरेकर यांनी थेट उच्च न्यायालयात येण्यापूर्वी अन्य कायदेशीर पर्यायांचा अवलंब करावा, असे नमूद करून न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दरेकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्याच वेळी दरेकर यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्या पाश्र्वभूमीवर दरेकर यांनी गुरुवारीच सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दुपारच्या सत्रात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे दरेकर यांचा अर्ज सुनावणीस आला. त्यावेळी दरेकरांच्या अटकपूर्व अर्जाची प्रत आपल्याला नुकतीच प्राप्त झाल्याने त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंतचा वेळ देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यावेळी तोपर्यंत दरेकर यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी मागणी त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली. तसेच तोपर्यंत दरेकरांवर अटकेसारखी कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले.  सोमवाररी (२१ मार्च) दुपारच्या सत्रात दरेकरांच्या  अर्जावर सुनावणी होणार आहे.  दरेकर यांच्यावर फसवणूक, खोटी माहिती देणे, विश्वासघात, बनावट कागदपत्रे सादर करणे आदींप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर हे बोगस ‘श्रीमंत’ मजूर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Order arrest praveen darekar monday immediate relief police file reply bogus labor case ysh

ताज्या बातम्या