scorecardresearch

ममतांविरोधात तक्रारीच्या चौकशीचे आदेश, अहवाल सादर करण्यासाठी पोलिसांना २८ एप्रिलपर्यंत मुदत

राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दाखल तक्रारीच्या चौकशीचे आदेश शिवडी दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी कफ परेड पोलिसांना दिले.

ममता बॅनर्जी mamata banerjee
ममता बॅनर्जी

मुंबई : राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दाखल तक्रारीच्या चौकशीचे आदेश शिवडी दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी कफ परेड पोलिसांना दिले. चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना २८ एप्रिलपर्यंतची मुदतही दिली. 

 बुधवारी सकाळच्या सत्रात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीबाबत नव्याने निर्णय घेण्यासंदर्भात विशेष न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाविरोधातील ममता यांचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले. त्या पार्श्वभूमीवर शिवडी येथील दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी ममता यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश कफ परेड पोलिसांना दिले. तपासादरम्यान, कफ परेड पोलीस ममता यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावू शकतील. याशिवाय अहवाल तयार करण्यापूर्वी पोलिसांना इतर पुरावेही गोळा करावे लागतील.

दरम्यान, विशेष न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करून न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने ममता यांना दिलासा देण्यास नकार दिला. ममता या लोकप्रतिनिधी असून अशा प्रकारची कारवाई लाजिरवाणी आहे आणि त्यामुळे ममता यांना नाहक त्रास सहन करावा लागेल, असा दावा ममता यांच्या वतीने माजिद मेमन यांनी केला होता.

प्रकरण काय?

डिसेंबर २०२१ मध्ये ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्या वेळी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. मात्र राष्ट्रगीत सुरू असताना ममता या जागेवर बसूनच होत्या. ते संपताना त्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या. ममता यांचे वर्तन हे राष्ट्रगीताचा अपमान करणारे असल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात भाजपचे स्थानिक पदाधिकारी वकील विवेकानंद गुप्ता यांनी शिवडी दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 00:58 IST

संबंधित बातम्या