नीट परीक्षेत चुकीचे प्रश्न आणि उत्तरपत्रिका

मुंबई : पर्यवेक्षकाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसणे योग्य नाही, असे नमूद करून नीटमध्ये चुकीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्याप्रकरणी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला, तसेच दोघांची परीक्षा पुन्हा घेण्याचे आणि त्याचा दोन आठवड्यांत निकाल जाहीर करण्याचे आदेश राष्ट्रीय परीक्षा कक्षाला (एटीए) दिले. भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

वैष्णवी भोपळे व अभिषेक कापसे या दोघांनी अ‍ॅड्. पूजा थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पर्यवेक्षकाने घातलेल्या गोंधळामुळे त्यांचे शैक्षणिक आयुष्य कसे धोक्यात आले आहे हे न्यायालयासमोर मांडले. परीक्षेच्या वेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकाला चूक लक्षात आणून दिली. मात्र परीक्षेत अडथळे निर्माण केल्याची तक्रार करण्याची धमकी पर्यवेक्षकाने दिल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला होता. न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठाने त्यांच्या याचिकेची दखल घेऊन दोन्ही विद्यार्थ्यांची २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले.