अनेक वर्ष अवयवदानाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना आशेचा किरण दाखवणाऱ्या अवयवदान मोहिमेबाबत अधिक व्यापक स्तरावर जनजागृती करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मुंबईत ४२ जणांनी अवयवदान केले असून मागील वर्षी ही संख्या एकने कमी होती. अखेरच्या आठवडय़ात लागोपाठ झालेल्या अवयवदानामुळे मुंबईतील अवयवदानाची संख्या मागील वर्षांपेक्षा एकाने वाढली.

सफी रुग्णालयात २९ डिसेंबर रोजी ६५ वर्षांच्या वृद्ध पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही मूत्रिपड व यकृत दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील एक मूत्रिपड सफीमधील रुग्णाला तर दुसरे मूत्रिपड हिरानंदानी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. ज्युपिटर रुग्णालयातील ४६ वर्षीय पुरुषावर यकृतरोपण शस्त्रक्रिया झाली. त्याआधी फोìटस रुग्णालयात २८ डिसेंबर रोजी ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पतीने दोन्ही मूत्रपिंड व यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. हे तीनही अवयव फोर्टिस रुग्णालयातील तीन रुग्णांना दान करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या ४२ अवयवदानातून ७२ रुग्णांना मूत्रपिंडदान, ३७ जणांना यकृतप्रत्यारोपण तर पाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आले. यावर्षी पहिल्यांदाच नायर रुग्णालयात १६ वर्षांच्या तरुणीच्या आकस्मिक निधनानंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. पालिका रुग्णालयातील हे एकमेव अवयवदान व मुलूंडमधील खासगी रुग्णालयातील पाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे या वर्षांतील अवयवदान मोहीमेतील मैलाचे दगड ठरले. याव्यतिरिक्त या वर्षांत अवयवदानाची मोहीम फारशी पुढे गेली नाही. गेल्या वर्षीही ४१ जणांकडून अवयवदान झाले होते. त्यातून ७१ मूत्रपिंड व ३५ यकृत प्रत्यारोपित करण्यात आली होती. २०१३ मध्ये २० जणांकडून तर २०१२ मध्ये २६ जणांकडून अवयवदान करण्यात आले होते.  राज्यात १९९५ ते मे २०१५ या वीस वर्षांत तब्बल ८,६०७ मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील केवळ ६ टक्के मूत्रपिंड मृत व्यक्तींकडून दान करण्यात आली होती. इतर रुग्णांसाठी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मूत्रपिंडदान झाले होते. याच काळात झालेल्या ३५२ यकृत प्रत्यारोपणातही मृत्यूनंतर केलेल्या १५० यकृतरोपणाचा सहभाग होता. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडून अवयवदान मोहिमेच्या जागृतीबाबत प्रयत्न केले जातात. अपघातात हात गमावलेल्यांवर हातांचे प्रत्यारोपण करण्याबाबतही यावर्षी व्याख्यानामार्फत चर्चा करण्यात आली. एकीकडे हृदयरोपण, हस्तरोपण यासारख्या शस्त्रक्रियांद्वारे अवयवदानाचे नविन दालन उघडत असतानाच मूत्रपिंडांच्या प्रतिक्षेत्र हजारो रुग्ण डायलिसीसचे उपचार घेत आहेत. अवयवदानाच्या प्रतिक्षायादीवरील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातुलनेत अवयवदानासाठी तयार होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या मात्र कमी आहे.

मृत्यूनंतरचे अवयवदान

२०१२ – २६

२०१३ – २०

२०१४- ४१

२०१५ – ४२