scorecardresearch

मुंबईत संघटित टोळ्या पुन्हा सक्रिय

मुंबईत संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असल्याची बाब पुन्हा निदर्शनास आली असून संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या गुरू साटम टोळीकडून दादरमधील बांधकाम व्यवसायिकाकडे पाच कोटी रुपये आणि एक सदनिका खंडणी म्हणून मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मुंबईत संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असल्याची बाब पुन्हा निदर्शनास आली असून संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या गुरू साटम टोळीकडून दादरमधील बांधकाम व्यवसायिकाकडे पाच कोटी रुपये आणि एक सदनिका खंडणी म्हणून मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने तक्रारी केल्यानंतर माहीम पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड सुरेश पुजारीने गोरेगावमधील हॉटेल व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर येथील बांधकाम व्यावसायिकाचा परळ येथील सुपारी बाग इस्टेट येथे एक बांधकाम प्रकल्प सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला असलेल्या गुरू साटमने ५५ वर्षीय तक्रारदाराला सर्वप्रथम २९ नोव्हेंबरला दूरध्वनी करून खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी गुरू साटमने दिली. याप्रकरणी साटम आणि तक्रारदारांची माहिती देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या सुरेश पुजारीविरोधात हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पुजारीने ६ सप्टेंबरला २९ वर्षीय तक्रारदाराला दूरध्वनी करून खंडणीची मागणी केली होती. सुरेश पुजारीला सध्या खंडणीच्या एका प्रकरणात गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. आता हॉटेल व्यवसायिकाने खंडणी प्रकरणी तक्रार केली.  सुरेश पुजारीविरोधात मुंबईत १८, ठाण्यात सात, नवी मुंबई व मिरा-भाईंदर येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांना दिली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२१ मध्ये फिलिपिन्समधील एका शहरातील तो राहत असलेल्या इमारतीच्या बाहेरून पुजारीला स्थानिक यंत्रणांनी ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Organized gangs reactivated mumbai ysh