राजकीय परिस्थितीवर मुंबई पोलिसांच्या विशेष बैठकीचे आयोजन

शिंदे यांच्या बंडांनंतर आता शिवसैनिकही रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे.

police
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: शिंदे यांच्या बंडांनंतर आता शिवसैनिकही रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या वेळी राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची कार्यालये व निवासस्थानांवर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय समाजमाध्यमांवरही नजर ठेवण्यास विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

रायकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विशेष बैठक बोलावली होती. त्यात सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्यासह सर्व अतिरिक्त पोलीस आयुक्त व उपायुक्त उपस्थित होते.  शहरात ११ जून ते १० जुलै या कालावधीसाठी मुंबई पोलीस कायद्यांतर्गत जमाव बंदीचे आदेश ३ जूनलाच देण्यात आले होते. त्यांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फलकबाजीवर लक्ष

राजकीय वातावरण तापले असताना परस्पर विरोधी गटांकडून फलकबाजी होण्याची शक्यता लक्षात घेता बैठकीत फलकबाजीवरही विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. परस्पर विरोधी फलकांमुळे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे सर्व पोलिसांना स्थानिक पातळीवरील फलकांकडेही विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फलक लावले जाणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी गरज पडल्यास प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Organizing special meeting mumbai police political situation ysh

Next Story
पक्षादेश डावलल्यास नव्हे, तर पक्षविरोधी कारवाया केल्यावरही अपात्रता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी