मुंबई : दलित पँथररचा सुवर्णमहोत्सव राज्यभर साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखालील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात वर्षभर विभागवार कार्यक्रमांचे आयोजन करून जातीय अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी दलित कार्यकर्त्यांमधील लढाऊबाणा पुन्हा प्रज्वलीत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आठवले यांनी सांगितले.
दलित पॅंथरच्या स्थापनेला यंदा ९ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या संघटनेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला एकेकाळचे दलित पँथरचे आघाडीचे नेते अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, दिलीप जगताप, गौतम सोनवणे, प्रेम गोहिल, सुरेश बारिशग, सुरेश सावंत, योगिराज बागुल आदी दलित पँथरशी संबंधित कार्यकर्ते, साहित्यिक उपस्थित होते. ९ जुलै रोजी दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या वेळी दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ व मराठवाडा असे विभागवार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त दलित पँथरचे प्रमुख नेते, कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जे नेते कार्यकर्ते हयात नाहीत, त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याचे ठरविण्यात आले.