मुंबई: क्रूझ पार्टीप्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आतापर्यंत २० आरोपींना अटक केल्यानंतर  या प्रकरणाचा तपास  महाराष्ट्रबाहेर पोहोचला आहे. जप्त करण्यात आलेल्या इक्स्टसीचा मूळ  विक्रेता परराज्यातील असल्याची माहिती एनसीबीला मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे. 

एनसीबीने याप्रकरणात अटक केलेला नायजेरियन वितरक चिनेदु इग्वे हा इक्स्टसी म्हणजे एमडीएमएचा वितरक आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्या मोबाईलवरून महत्त्वपूर्ण संभाषण एनसीबीच्या हाती लागले होते. 

त्यात अचित कुमार सोबत झालेल्या संभाषणावरून एनसीबीने चिनेदुला अटक केली होती.  त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला होता. अचितकडून मिळालेल्या माहितीवरून अंधेरी येथे छापा टाकून चिनेदु इग्वे याला अटक करण्यात आली.

त्याच्याकडून एमडीएमएच्या ४० गोळ्या सापडल्या होत्या. त्यात पॉपीन म्हणून  ओळखले जाणारे १५ ग्रॅम एमडीएमए हे पार्टी ड्रग्स सापडले आहे. या प्रकरणातील उच्च प्रतीची एक्स्टसी म्हणजेच एमडीएमएचा मूळ विक्रेता परराज्यातील असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणानंतर आता सुमारे सहा विक्रेत्यांची माहिती एनसीबीने गोळा केली आहे.

आर्यनसह सर्व आरोपींच्या आर्थिक स्त्रोतांची तपासणी

एनसीबीने याप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनसह २० जणांना आरोपी केले असून या सर्वांचे आर्थिक स्त्रोत तपासले जात आहेत. त्यातील सराईत आरोपींच्या बँक खात्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. पण आर्यनसह इतर काही आरोपींच्या बँक खात्याची माहिती लवकरच प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आर्यनबाबत मागितलेली कागदपत्रे शाहरुखच्या व्यवस्थापक पुजा ददलानी यांनी शनिवारी सकाळी एनसीबी कार्यालयात दिली. दरम्यान उच्च न्यायालयातही आर्यनच्या जामिनाला एनसीबीकडून विरोध करण्यात येणार आहे.