scorecardresearch

बालगृहातील विद्यार्थ्यांना अनाथ प्रमाणपत्र त्वरित द्या!; ‘नीट’ परीक्षा देण्यासाठी उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

नीट-२०२२ परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या बालगृहातील दोन विद्यार्थ्यांना ते अनाथ असल्याचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

SSC HSC board exam

मुंबई : नीट-२०२२ परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या बालगृहातील दोन विद्यार्थ्यांना ते अनाथ असल्याचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. दोन्ही विद्यार्थी अनाथ मुलांसाठीच्या बालगृहात राहतात. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले असून त्याची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. हे बालगृह चालवणाऱ्या ‘द नेस्ट इंडिया फाऊंडेशनह्ण या स्वयंसेवी संस्थेने या दोन विद्यार्थ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.

दोन्ही विद्यार्थ्यांना एमबीबीएसचा पदवी अभ्यासक्रम करायचा आहे. अभ्यासक्रमाकरिता अर्ज करण्यासाठी आणि नीट परीक्षेसाठी त्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये अनाथ प्रमाणपत्रह्ण उपलब्ध करावे या मागणीसाठी मुंबई जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाकडे अर्ज केला होता.

संबंधित कार्यालयात अनेक फेऱ्या मारूनही आणि दूरध्वनीवरून संपर्क साधूनही प्रमाणपत्र दिले गेले नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले. तर याचिकाकर्त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करता आले नाही, असा दावा सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी केला.

प्रमाणपत्रासाठी एका आठवडय़ाची मुदत

संबंधित विभागाच्या दिरंगाईबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी याचिकाकर्त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये अर्ज केला आणि आजपर्यंत संबंधित प्राधिकरणाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे न्यायालयाने सुनावले. नोव्हेंबर २०२० पासून आजपर्यंत अधिकाऱ्यांनी दोन्ही याचिकाकर्त्यांच्या अर्जामधील त्रुटींची माहिती दिल्याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच दोन्ही विद्यार्थ्यांना एका आठवडय़ाच्या आत अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध करण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orphan certificate students immediately high court orders state government conduct nit exam ysh