|| शैलजा तिवले

फिफा विश्वचषकाची रंगत वाढू लागली आहे.. भारत या स्पर्धेचा भाग नसला तरी कोटय़वधी भारतीय फुटबॉल शौकिन या महोत्सवाचा आनंद घेत आहेत. भारताचे या महोत्सवामध्ये खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी मुंबईतील ऑस्कर फाऊंडेशनच्या सहा खेळाडूंची निवड या विश्वचषकामध्ये सहभागी होण्यासाठी झाली आहे. या निमित्ताने या फाऊंडेशनच्या प्रवासावर एक नजर..

ऑस्कर फाऊंडेशन

फुटबॉल हे माध्यम घेऊन मूलभूत गरजा भागविण्यासाठीही कठीण असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, करिअर घडविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि या संधीचा फायदा घेऊन उडण्याचे बळ त्यांच्या पंखांमध्ये निर्माण करणे या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी सुरू झालेला ऑस्कर फाऊंडेशनचा हा अनोखा प्रयोग आता मुळे रुजवू पाहत आहे.

मुंबईतील कफ परेड येथील आंबेडकर वस्ती. इथले बहुतांश लोक मच्छीमारीचा व्यवसाय करतात. साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शिक्षणाचा मागमूसही नसलेल्या या वस्तीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मुले शाळेत जात होती आणि ती ही नावापुरतीच. पाचवीत गेलेल्या मुलांना ना लिहिण्या-वाचनाचा गंध ना शाळेची विशेष आवड. मासे विक्रीचा ताजा पैसा या मुलांच्या हातामध्ये सहज येत असल्याने व्यसन, गुन्हेगारी जगाकडे आपसूकच यांची पावले वळत गेली. या मुलांसोबतच वाढलेल्या परंतु केवळ वडिलांच्या धाकामुळे अभ्यासाकडे लक्ष देणाऱ्या अशोक राठोड यांनी लहानपणापासून हेच चित्र त्यांच्या वस्तीमध्ये पाहिले. तेव्हा आपल्या मित्रांप्रमाणे वस्तीतल्या मुलांचे भविष्य अंधारात भटकू नये, याच उद्देशाने त्यांनी वस्तीतल्या शाळा सोडलेल्या १२-१३ वर्षांच्या १८ मुलांना गाठून फुटबॉलचा खेळ सुरू केला. वयाच्या १९व्या वर्षी मिळणाऱ्या १९०० रुपयांच्या कमाईतील ५०० रुपये खर्च करून फुटबॉल घेतलेल्या अशोक यांनी सुरू केलेला हा पहिला प्रयोग.

फुटबॉल हा आमच्यासाठी केवळ खेळ नसून प्रतिकूल परिस्थितीतील मुलांचे भविष्य घडविण्याचा मार्ग हाच विचार घेऊन सुरू झालेला हा प्रयोग. फुटबॉलमध्ये चांगलीच रुळल्यावर शाळेत जाण्याबाबत मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी नकारच दिला. संवादामधून त्यांच्या आर्थिक अडचणी, अभ्यासाबाबतची भीती आणि सरकारी शाळांमध्ये मिळणारा अभ्यासाचा दर्जा या अडचणी समजून घेतल्या. प्रसंगी त्यांना शाळेत गेलात, तरच फुटबॉल खेळायला मिळेल, हा धाकही दाखविला. अखेर १८ ही मुले पुन्हा शाळेत दाखल झाली. इथून खरा प्रवास सुरू झाला. शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी त्यांच्या अभ्यासावर लक्ष देणेही गरजेचे होते, मग फुटबॉलसोबत शिक्षणाचा उपक्रम सुरू झाला.

कामाचा डोलारा विस्तारत गेला, मात्र तो सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागली. यातूनच संस्था सुरू करण्याचा खटाटोप सुरू झाला आणि ऑस्कर फाऊंडेशन साकारली. एक तास फुटबॉलचा खेळ आणि एक तास जीवन शिक्षण असा हा कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये आरोग्याची स्वच्छता, पौगंडावस्थेत शरीरामध्ये होणारे बदल, स्त्री-पुरुष समानता, आत्मविश्वास आदी जीवन कौशल्ये साध्य करण्यासाठी मुलांना मदत केली जाते.

पालकांशी संवाद

खेळण्यासाठी पालकांची अनुमती मिळावी यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते. विशेषत: मुलींच्या बाबत पालकांची भूमिका बदलण्यासाठी वस्तीमध्ये विविध उपक्रम सुरू केले. यामधून पालकांचा ऑस्करला पाठिंबा तर मिळालाच शिवाय मुलीही मोठय़ा प्रमाणात खेळण्यासाठी म्हणून मैदानावर येऊ  लागल्या. मुलींचा फुटबॉल संघ तयार करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला, असे अशोक सांगतात.

युवा नेतृत्व उपक्रम

साधारणपणे १७ ते २२ वयोगटातील मुलांना युवा नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाते. ऑस्करअंतर्गत शिकणारी ही मुलेच आता या प्रशिक्षणानंतर वस्तीमधील इतर मुलांना शिकविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या उपक्रमातून सुमारे ५०० युवकांनी प्रशिक्षण घेतले असून या माध्यमातून ऑस्करचे काम झारखंड, दिल्ली आणि कर्नाटकपर्यंत विस्तारले आहे. आता विशाखापट्टणम येथे देखील ऑस्करचे उपक्रम सुरू होणार आहेत.

खेळाच्या मैदानांची कमतरता

मुंबईमध्ये मुळातच खेळासाठी मोजकीच सार्वजनिक मैदाने उपलब्ध आहेत. खासगी मैदानांसाठी दोन तासांचे सुमारे १५ हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे फुटबॉलच्या खेळासाठी मैदान मिळविणे सध्या ऑस्करसाठी खूप अडचणीचे ठरत आहे. मुंबईमधून सीएसआर अंतर्गत दोन कंपन्यांचा बहुमोलाचा सहभाग आहे. मात्र दिवसेंदिवस मुलांची संख्याही वाढत असल्याने अधिकाधिक कंपन्यांनी पुढाकार घेऊन सीएसआर अंतर्गत या ऑस्करला मदत करावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अशोक राठोड यांनी केले आहे.

शिक्षण उपक्रम

ऑस्कर फाऊंडेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला सुरुवातीला एक अर्ज भरावा लागतो. यामध्ये मुळाक्षरे, अंक, वाक्य लिहावी लागतात. त्यामुळे ज्यांना हा अर्ज पूर्णपणे भरता येत नाही, ती मुले शाळाबाह्य़ असल्याचे लगेचच समजते. या मुलांचा वेगळा गट तयार करण्यात येतो आणि यांना पुन्हा शाळेमध्ये दाखल केले जाते. यंदा ऑस्करने एकूण २० शाळाबाह्य़ मुलांना शाळेत दाखल केले आहे. तसेच या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडविण्यासाठी भाषा, गणित आदी विषयांच्या शिकविण्या घेतल्या जातात. ऑस्करमध्ये दाखल होणाऱ्या मुलाला शिक्षण पूर्ण करणे ही प्राथमिक अट मान्यच करावी लागते.

फुटबॉलचे प्रशिक्षण आणि खेळण्याची संधी

ज्या मुलांना मनापासून या खेळाची आवड असून यामध्ये करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी खेळाचे नियम, यातील डावपेचपासून ते रोजचा सराव यावर विशेष मेहनत घेतली जाते. ऑस्करच्या माध्यमातून यातील अनेक मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर खेळण्याची संधी मिळत आहे. ऑस्करची सहा मुले आता सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील फुटबॉल फॉर होप या महोत्सवासाठी लवकरच रशियाला जाणार आहेत. तसेच आता ऑस्करची १५ मुले डोनोस्टी कपसाठी स्पेनला जाणार आहेत. सध्या ऑस्करमध्ये जवळपास ३००० मुले प्रशिक्षण घेत आहेत.