मुंबई : ओशिवरा येथील एका निवासी इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके याला कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
खान याला त्याच्या परवानाधारक बंदुकीने गोळीबार केल्याच्या आरोपाखाली २३ जानेवारी रोजी ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खान याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात त्याने, त्याची अटक मनमानी आहे आणि हे प्रकरण तपास यंत्रणेद्वारे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करण्यासारखे आहे, असा दावा केला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, खान याने १८ जानेवारी रोजी ओशिवारा परिसरातील नालंदा सोसायटीमध्ये आपल्या परवानाधारक शस्त्राने दोन गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना त्याने दिलेला जबाबही न्यायालयात सादर केला.
दरम्यान, तपास करताना पोलिसांना सोसायटीच्या आवारात दोन गोळ्या सापडल्या. एक दुसऱ्या मजल्यावर आणि दुसरी चौथ्या मजल्यावर सापडली होती. त्यापैकी एक फ्लॅट एका लेखक-दिग्दर्शकाचा आहे, तर दुसरा एका मॉडेलच्या मालकीचा आहे. सुरुवातीला, सीसीटीव्ही चित्रिकरणात काहीही आढळून न आल्याने सुरूवातीला पोलिसांना म्हणावा तसा तपास करता आला नाही. तथापि, न्यायवेद्यक विश्लेषणातून, गोळीबार खान यांच्या बंगल्यातून करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर, खान याला अटक करण्यात आली.

