जोगेश्वरी येथे राहणार्या एका महिलेची अश्लील चित्रफीत प्रसारित करून तिची बदनामी केल्याप्रकरणी रमेश रतीराम सक्सेना (२५) या तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत या महिलेचा प्रियकराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत प्रियकरानेच महिलेची चित्रफीत त्याला पाठवण्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार महिला आणि तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.
हेही वाचा >>> जुहू हत्या प्रकरण : मृत महिलेची भीती खरी ठरली…दुसरी तक्रार केल्यानंतर सहा दिवसांनी महिलेची हत्या
दीड वर्षांपूर्वी ती उत्तर प्रदेशात गेली होती. तिथेच तिची एका तरूणासोबत ओळख झाली होती. त्या तरूणालाही नोकरीची गरज असल्याने तो तिच्यासोबत मुंबईत आला होता. त्यानंतर तो जेवणासाठी तिच्या घरी येत होता. याचदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशात चांगली नोकरी मिळाल्याने तो तेथे निघून गेला. मात्र त्यानंतरही ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते दोघे व्हिडीओ कॉलवरून संभाषण करीत होते. त्यावेळी आरोपीने तिचे आक्षेपार्ह स्थितीतील चित्रीकरण केले होते.
तिच्या परिचित एका व्यक्तीने २६ नोव्हेंबर रोजी तिची एक अश्लील चित्रफीत त्याच्याकडे आल्याचे सांगितले. ती चित्रफीत पाहून तिला धक्काच बसला. चौकशी केली असता ती चित्रफीत रमेशने पाठविल्याचे त्याने सांगितले. रमेशने ती चित्रफीत इतर काही लोकांना पाठविली होते. हा प्रकार निदर्शनास येताच या महिलेने प्रियकर आणि रमेश सक्सेना या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध विनयभंग, बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच रमेशला पोलिसांनी अटक केली.