उड्डाणपुलाचे काम रेंगाळल्याने जून २०१६ उजाडणार
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभे राहत असलेले बहुप्रतीक्षित ओशिवरा स्थानक येत्या मार्चअखेर सुरू होण्यास पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे. या स्थानकावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम करण्यास महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याने जून २०१६ पूर्वी हे स्थानक सुरू करणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ओशिवरा स्थानकाला जोडण्यात येणारा पादचारी पुलाला पालिकेने परवानगी देताच अन्य कामाला गती मिळाली होती. त्यात प्रामुख्याने फलाटांचे तसेच रेल्वेच्या भागातील उड्डाणपूल बांधण्याचे काम एमआरव्हीसीने पूर्ण झाले होते. त्यामुळे येत्या मार्चअखेर ओशिवरा स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र मुंबई महापालिकेकडून या स्थानकावरून जाणाऱ्या उड्डाणपूल बांधण्याची मुदत तीन वेळा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आता पालिकेने हे काम महिन्याभरात पूर्ण केल्यानंतरही ओशिवरा स्थानक सेवेत येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगाव विस्तार करण्याचे जाहीर होताच ओशिवरा स्थानकाचे काम रखडले होते. याशिवाय या स्थानकाला दोन्ही बाजूने जोडणारा पादचारी पूल व उड्डाणपूल परवानगीमुळे अडथळा निर्माण झाला होता. मात्र दोन्ही अडथळे दूर करत या स्थानकाचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले. मात्र उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे ओशिवरा स्थानकाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे गेला आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.