संदीप आचार्य 
मुंबई: ‘डॉक्टर,छातीत दुखतंय… कृपा करून मला दाखल करून घ्या’… ६५ वयाचे सामद डॉक्टरांना सांगत होते. अखेर बऱ्याच वेळानंतर काही प्रश्न विचारून त्यांना जे.जे. रुग्णालयात जाण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला… गर्भवती असलेल्या आशाला घेऊन तिच्या पतीने आसपासच्या खासगी रुग्णालयांचे उंबरठे अक्षरश: झिजवले. आशा ला करोनाची लागण झाली असेल तर?… या संशयातून तिच्यावर उपचार करायचे सोडून अन्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला डाॅक्टर देत होते. अखेर पालिकेच्या नायर रुग्णालयात बऱ्याच खटपटीनंतर अवघडलेल्या आशाला दाखल करण्यात आले, आणि तिच्या पतीने सुटकेचा निःश्वास सोडला!

करोनाच्या चक्रव्युहात आज सामान्य रुग्ण अक्षरश: भरडला जात आहे. खासगी असो की सरकारी रुग्णालये असो, रुग्णाला दाखल करून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. याचा मोठा फटका आज करोनाची लागण नसलेल्या व अन्य आजारांसाठी उपचाराची गरज असलेल्या शेकडो रुग्णांना बसत आहे. कोणीतरी आपल्यावर उपचार करावे म्हणून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावणाऱ्या रुग्णांच्या अनेक केविलवाण्या काहाण्या समोर येत आहेत.

करोनाची लागण समाजात पसरू नये यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासूनच मूत्रपिंडविकार, ह्रदयविकार, डोळ्याचे रुग्ण असो की गर्भवती महिला असो या साऱ्यांनाच उपचारासाठी रुग्णालय व डॉक्टर मिळणे अवघड होऊन बसले आहे. मुंबई महापालिकेच्या जवळपास सर्व रुग्णालयात तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयापासून जे.जे. रुग्णालयापर्यंत बहुतेक सर्व रुग्णालयांनी करोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजित शस्त्रक्रिया रद्द तरी केल्या किंवा पुढे ढकलल्या. या गोष्टीला आता जवळपास महिना झाला असून किडनी स्टोनसह अनेक शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांपुढे आता करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या उपनगरातील रुग्णालयात गेले तर तेथील डॉक्टर हात वर करून केईएम, शीव व नायर रुग्णालयात पाठवून देतात. येथेही या रुग्णांची बरीच रखडपट्टी होत असते हे पालिकेच्या वरिष्ठ डॉक्टरांनाही मान्य आहे.

करोनाची लागण अथवा संपर्कात आल्यामुळे तसेच लॉकडाउनमुळे एकीकडे मोठी हॉस्पिटल व नर्सिंग होम जवळपास बंद झाली आहेत. मुंबईतील १७ हजार नर्सिंग होमपैकी फारच थोडी सध्या सुरु असल्याने पालिका रुग्णालय व जेजे रुग्णालय हाच प्रमुख पर्याय सामान्य रुग्णांकडे आहे.

“महापालिका रुग्णालयात अथवा खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग अथवा अपघात विभागात येणार्या प्रत्येक रुग्णाला तात्काळ तपासून योग्य उपचार मिळाले पाहिजेत” असे लीलावती रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी सांगितले. “घरात वृद्ध माणूस पडून हाड मोडले, मधुमेहाच्या रुग्णाला जखम झाली वा ह्रदयविकारादी रुग्णांनी जायचं कुठे?” असा सवाल करत डॉ जोशी म्हणाले, “या रुग्णांना करोना आहे वा नाही याचा विचार न करता प्रथम तपासले गेले पाहिजे. डॉक्टरांना जर आवश्यक वाटले तर त्यांनी करोना चाचणी करावी व करोना आढळल्यास संबंधित रुग्णालय वा विभागात उपचारासाठी दाखल करावे. करोनाच्या नावाखाली सामान्य रुग्ण आज जागोजागी भरडला जात असून याची पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेतली पाहिजे. तसेच मोठी रुग्णालयेही सरसकट बंद करणे अयोग्य आहे. ज्या विभागात डॉक्टर व परिचारिकांना लागण झाली असेल तेवढा विभाग बंद करून तात्काळ त्याचे निर्जंतुकीकरण करून घेतले पाहिजे. करोना व्यतिरिक्त अन्य आजाराच्या अथवा शस्त्रक्रिया खोळंबलेल्या रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे” असंही डॉ शशांक जोशी म्हणाले.

“यासाठी पालिका व अन्य रुग्णालयांनी बाह्यरुग्ण विभाग व अपघात विभागात तपासणी करणार्या डॉक्टरांना करोना संरक्षित पोशाख दिल्यास कोणत्याही भीती शिवाय हे डॉक्टर येणार्या प्रत्येक रुग्णाला तो करोनाचा आहे अथवा नाही याचा भेदभाव न करता तपासतील असेही डॉ जोशी यांनी सांगितले. डॉक्टरांमधील भीती दूर होण्यासाठी त्यांना पुरेसे करोना पोषाख, मास्क आदी मिळाल्यास करोना व्यतिरिक्तच्या रुग्णांनाही योग्य प्रकारे तपासणी व उपचार मिळू शकेल” असेही ते म्हणाले.

“रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णांकडे संशयाने पाहिले जाते. त्यात करोनाचा रुग्ण असेल तर संबंधित रुग्णालयात वेगळे उपचार केले जातात. यात अन्य आजार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेले रुग्ण मग त्याला करोना असेल अथवा नसेल ते पार भरडले जातात. काही रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे वृत्त माध्यामातून प्रसिद्ध झाले आहे” असेही डॉ जोशी यांनी सांगितले.

अनेक लोकप्रतिनिधींच्याही अशाच तक्रारी असून महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, “करोना प्रमाणेच अन्य आजारांच्या रुग्णांनाही पालिका रुग्णालयात उपचार देण्यात येतात. काही तक्रारी नक्कीच आहेत. बाह्य रुग्ण वा अपघात विभागात आलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळालेच पाहिजे. बहुतेक नियोजित शस्त्रक्रिया रद्द केल्या त्याही आता सुरू कराव्या लागतील. तसेच केईएम, शीव व नायर या तिन्ही रुग्णालयात बाह्य रुग्ण व अपघात विभागातील सर्व डॉक्टरांना करोना संरक्षित पोषाख व पुरेसे मास्क तात्काळ दिले जातील. जेणे करून कोणत्याही रुग्णाला तपासण्यात अडचण येणार नाही.याची अंमलबजावणी आजच्या आज होईल”, असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेच्या अन्य प्रमुख उपनगरीय रुग्णालयातही याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असेही अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले.