भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा एकदा २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीचा इशारा दिल्याचं दिसून आलं आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे परत घेतले जात असल्याची घोषणा केल्यानंतर, आता ‘एमएसपी’वर हमी कायद्याची आंदोलक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत माध्यमांशी बोलताना राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.

“आम्ही एकत्र आहोत, आम्ही आमचं मुद्दा मांडला, आम्हाला दहशतवादी घोषित करून तुरूंगात टाका. भारत सरकारने आपलं डोकं ठीक करून घ्यावं. ते जे गुंडागिरी करू इच्छित आहेत, ती त्यांची गुंडागिरी चालणार नाही. वर्षभर शेतकऱ्यांनी खूप सहन केलं. आपलं डोकं ठीक करून एमएसपीवर हमी कायदा तयार करावा. नाहीतर आम्ही आहे तिथेच आहोत, २६ जानेवारी काही दूर नाही मग. ही २६ जानेवारी पण इथेच आहे आणि देशाचे चार लाख ट्रॅक्टरपण इथेच आहेत आणि या देशाचा शेतकरी देखील इथेच आहे. आपलं डोकं ठीक करून चर्चा करावी.” असं शेतकरी नेते राकेश टिकैत मोदी सरकाराल उद्देशून म्हणाले आहेत.

मागील वर्षी २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान मोठ्याप्रमाणात हिंसाचार उफाळला होता. मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यावर चढले होते. त्या घटनेमुळे संपूर्ण देशभरातील राजकीय वातावरण तापलं होतं. आता पुन्हा एकदा राकेश टिकैत यांनी अप्रत्यक्षपणे प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीचा सूचक इशारा दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, किसान मजदूर महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “सरकार धोखा करत आहे. सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या सरकार चर्चा करण्याच्या लाइनवर आलेलं नाही. हे सरकार षडयंत्रकारी, बेईमान आणि फसवे आहे. शेतकरी समाज आणि कामगारांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.” अशी टीका यावेळी राकेश टिकैत यांनी केली.

टिकैत यांनी मोदी सरकारला हा अल्टिमेटम अशावेळी दिला आहे, जेव्हा सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायदे परत घेण्यासाठी विधेयक सादर केले जाईल. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी एमएसपीवर विचार करण्यासाठी समिती गठीत करण्याचेही आश्वासन दिले होते.