scorecardresearch

“मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचीच ताकद आहे हे…” जाणून घ्या काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली त्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचीच ताकद आहे हे…” जाणून घ्या काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

मुंबई महापालिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडीपैकी शिवसेनेच्या ठाकरे गटाची ताकद आहे निर्विवाद सत्य आहे. आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. काँग्रेसचा निर्णय त्यांचे वरिष्ठ घेतली. आम्ही एकत्र सरकार चालवत असताना सांगितलं होतं की तुम्ही आम्हालाही सोबत घ्या आपण मुंबईत काम करू. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सकारात्मक संकेत दिले होते. आता गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय परिस्थिती बदलली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी चर्चा करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडीची युती ही महापालिकेसाठी झाली आहे असं मला समजतं आहे. त्यांची युती कशा पद्धतीने पुढे जाणार हे पाहता येईल. मी आज या विषयावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहोत असंही अजित पवार यांनी सांगितलं.

मागे आमची काय चर्चा झाली होती?

महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या तीन पक्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आमचं असं ठरलं होतं की जे जागा वाटप आपल्या तीन पक्षांमध्ये होईल त्या जागांमधून मित्रपक्षांना जागा सोडायच्या. म्हणजे काँग्रेसने काँग्रेसला मिळालेल्या जागांमधून, राष्ट्रवादीने आम्हाला मिळालेल्या जागांमधून आणि शिवसेनेने त्यांना मिळालेल्या जागांमधून. असा ठराव झाला होता. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी झाला होता. महापालिकेच्या संदर्भात आमची चर्चा बाकी आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची आहे. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये त्यांचं काय ठरलं आहे? जागावाटपावरून काय ठरलं आहे? यावर आम्ही चर्चा करणार आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राजकारणात मागच्या निवडणुकीत काय झालं त्याला काही अर्थ नसतो

राजकारणात मागच्या निवडणुकीत काय झालं त्याला काही अर्थ नसतो. राजकारणा येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन तुम्हाला पावलं उचलावी लागतात. कारण मागचं काढायचं झालं तर अनेक गोष्टी काढता येतील. पण ज्या दिवसापासून युती किंवा आघाडी होते त्या दिवसापासूनच पुढे जावं लागतं. त्यामुळे मागे काय झालं त्याला काही अर्थ नाही. पुढे काय करायचं या गोष्टीला राजकारणात महत्त्व असतं.

उद्धव ठाकरेंनी मित्र पक्ष म्हणून कुणाला सोबत घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न

उद्धव ठाकरेंनी कुणाला मित्र पक्ष म्हणून सोबत घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आपल्याला ज्या जागा मिळणार आहेत त्यात मित्र पक्षांना सामावून घेतलं तर इतर पक्षांची त्या पक्षाला ना असण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांबाबत काय ठरलं आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. मी आणि जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या