लसीकरणामुळे साथ नियंत्रणात

करोना विषाणूंचे प्रकार शोधण्यासाठी करण्यात आलेल्या चौथ्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष पालिकेने नुकतेच जाहीर केले असून यासाठी ३४५ बाधित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती.

चौथ्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर; लसीकरण झालेल्यांपैकी एकाचाही मृत्यू नाही

मुंबई : करोना विषाणूंचे प्रकार शोधण्यासाठी करण्यात आलेल्या चौथ्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष पालिकेने नुकतेच जाहीर केले असून यासाठी ३४५ बाधित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी मुंबईतील २८१ रुग्णांपैकी ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ७५ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’चे २५ टक्के रुग्ण आढळले आहेत. २८१ पैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी करोना लसीची एकही मात्रा घेतली नव्हती, तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे या चाचणीदरम्यान आढळून आले. लसीकरणामुळे करोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

करोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा शोध घेणारी वैद्यकीय यंत्रणा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर तीन तुकडय़ांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. चौथ्या तुकडीमध्ये मुंबईतील एकूण २८१ रुग्णांमधील करोना विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’चे ७५ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’चे २५ टक्के रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी करोनाच्या लसीची एकही मात्रा घेतली नव्हती. तसेच त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

मुंबईतील २८१ रुग्णांपैकी २६ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ८५ रुग्ण (३० टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९६ रुग्ण (३४ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ६६ रुग्ण (२३ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ८ रुग्णांचा (३ टक्के) यामध्ये समावेश आहे. चाचणीतील निष्कर्षांनुसार २८१ पैकी २१० रुग्ण (७५ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ७१ रुग्ण (२५ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ प्रकारातील करोना विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालक व लहान मुलांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

लस न घेतलेल्या ६९ जणांना बाधा

या २८१ पैकी पहिली मात्रा घेतलेल्या फक्त आठ जणांना, तर दोन्ही मात्रा घेतलेल्या फक्त २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ६९ नागरिकांना बाधा झाली. त्यातील १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तिघांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागले, तर चार जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले चारही रुग्ण ६० वर्षांवरील होते. यातील दोघांना दीर्घकालीन आजार होते. तर अन्य दोघांना कोणतेही आजार नव्हते.      

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Outbreaks appear exacerbated vaccination ysh

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या