मुंबई : यंदापासून पुन्हा इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ एप्रिल राेजी होणार असली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा केंद्र घर व शाळेपासून दूर आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परिणामी, पालकांकडून चिता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जाहीर केली. प्रवेशपत्रे तपासली असता विद्यार्त्यांना त्यांच्या शाळा व घरापासून दूर असलेल्या ठिकाणीच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना स्वत:च्या शाळेत किंवा शाळेजवळील अन्य शाळेतील परीक्षा केंद्रावर देता येत होती. मात्र यंदा काही विद्यार्थ्यांना ७ ते १० किलोमीटर दूर परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
इयत्ता चौथी व सातवीची मुले लहान असल्याने त्यांना या दूरवरच्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्रास होणार आहे. त्याचबरोबर पालकांनाही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कामावर जाणाऱ्या पालकांसाठी मुलांना एवढ्या दूरवरील परीक्षा केंद्रातून ने-आण करणे कठीण होणार आहे. अर्ज भरताना योग्य पर्यायच निवडले असूनही मुले शिकत असलेल्या शाळा किंवा त्या शाळांजवळ परीक्षा केंद्र देण्याऐवजी इतक्या दूरवर परीक्षा केंद्र का देण्यात आले आहे, असा प्रश्न शाळा व पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
काही शाळांनी अजून प्रवेशपत्र तपासण्याचे काम सुरू ठेवले असून, अशाच प्रकारच्या अडचणी आढळल्यास शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शाळांच्या मते, लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षा शक्यतो त्यांच्या शाळेत किंवा जवळच घेणे आवश्यक असते. दहा वर्षांनंतर इयत्ता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आल्याने यंदा ही पहिलीच वेळ आहे. याआधी पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेतली जात होती. या बदलामुळे केंद्रवाटपात अडचणी निर्माण झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
प्रशासनाचे म्हणणे…
शाळांकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात राज्य परीक्षा परिषदेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. केंद्रवाटप हे शाळांनी अर्ज भरताना निवडलेल्या परिसराच्या आधारे देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
