मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण केंद्राच्या (‘आयडॉल’) कला शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘आयडॉल’ आणि विद्यापीठाच्या परीक्षा चर्चेत आल्या आहेत.

‘आयडॉल’च्या कला शाखेच्या प्रथम वर्षांचे (एफवायबीए) निकाल नुकतेच जाहीर झाले. मुळातच ‘आयडॉल’चे काय होणार आणि पदवी वैध ठरणार का या संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षांच्या परीक्षेचे निकाल हाती आल्यावर नव्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांना एक किंवा अधिक विषयांत शून्य गुण मिळाले आहेत. एफवाय बीएच्या २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. त्यापैकी २१३ विद्यार्थ्यांना एका विषयात, १८ विद्यार्थ्यांना २ विषयांमध्ये, ४ विद्यार्थ्यांना ३ विषयांत तर एका विद्यार्थ्यांला ४ विषयांत शून्य गुण मिळाले आहेत. प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवल्यानंतरही शून्य गुण कसे मिळू शकतात असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

‘‘आयडॉल’च्या विद्यार्थ्यांच्या पदवीबाबत प्रश्न उपस्थित झाले असताना विद्यापीठ मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण, दोन गुण मिळाले आहेत. विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाचे शुल्क न घेता या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा अन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलन करण्यात येईल,’ असे स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अ‍ॅड. सचिन पवार यांनी सांगितले.

प्रथम वर्ष बीएची परीक्षा ५ हजार ९० विद्यार्थ्यांनी दिली होती. सर्वच विषयांत विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले नाहीत किंवा एखाद्याच विषयांत अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेत असेही झालेले नाही. विद्यार्थी निकालाबाबत असमाधानी असतील तर ते पुनर्मूल्यांकन किंवा छायाप्रतीसाठी अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्यांचे निकाल प्राधान्याने जाहीर करण्यात येतील.

      – विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, ‘आयडॉल’