लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. उन्हामुळे काहिली होणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. उष्णता वाढू लागल्याने पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे कल वाढला आहे. १ एप्रिल रोजी ३,५०० हून अधिक प्रवाशांनी मासिक पास खरेदी केले. तर, याआधी मार्च महिन्यात ३,६२३ प्रवाशांनी मासिक पास काढले होते. राज्यासह देशभरात अनेक भागांत एप्रिल ते जून महिना तीव्र उकाडा जाणवू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वातानुकूलित लोकलचा मार्ग निवडला आहे. प्रवाशांनी १ एप्रिल रोजी २७,१८४ तिकीटे आणि पास काढले. यामध्ये ३,५६१ मासिक पास आणि २३,६२३ तिकिटांचा समावेश आहे. आणखी वाचा-मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव याआधी ४ मार्च रोजी २३,०६२ तिकीटे आणि सीजन तिकीटे म्हणजेच पास काढले. यातील ३,६२३ मासिक पास आणि १९,४३९ तिकीटे काढली. मासिक पास काढण्याचे प्रमाण सोमवारी अधिक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मासिक पास काढणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे कायम दिसून येते. अनेक कार्यालयांना शनिवारी-रविवारी सुट्टी असल्याने या दिवसांचे तिकीट वाया जाऊ नये, त्यामुळे सोमवारी मासिक पास काढण्याचे प्रमाण अधिक असते, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. आणखी वाचा-‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच प्रवास केलेल्या एकूण प्रवाशांची संख्या २०२१-२२ - २० लाख ९९ हजार ४४९ २०२२-२३ - २ कोटी ३१ लाख ९४ हजार ६९४ पश्चिम रेल्वेवरून सध्या ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात.