‘महाराजा’ची घरवापसी!; सात दशकांनंतर ‘एअर इंडिया’ पुन्हा टाटा समूहाकडे

टाटा समूहाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘एअर इंडिया’ विमान कंपनी खरेदीसाठी यशस्वी बोली लावली होती़ 

सात दशकांनंतर ‘एअर इंडिया’ पुन्हा टाटा समूहाकडे

सुमारे सात दशकांनंतर ‘महाराजा’ची टाटा समूहाकडे घरवापसी झाली़  कर्जजर्जर झालेल्या ‘एअर इंडिया’ची मालकी गुरुवारी पुन्हा मिळवताच टाटा समूहाने या कंपनीला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला़

टाटा समूहाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘एअर इंडिया’ विमान कंपनी खरेदीसाठी यशस्वी बोली लावली होती़  त्यानुसार ‘एअर इंडिया’च्या हस्तांतरणाबाबत ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एऩ़ चंद्रशेखरन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली़ त्यानंतर चंद्रशेखरन यांनी ‘एअर इंडिया’च्या कार्यालयात जाऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आणि नव्या संचालक मंडळाची बैठक पार पडली़

‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी स्पाईस जेटच्या प्रवर्तकांनी १२,९०६ कोटी रुपयांची बोली लावली होती़  मात्र, सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने लावलेली १८ हजार कोटी रुपयांची बोली जिंकली़ त्यातील २७०० कोटी रुपये रोख स्वरूपात देण्याचे ठरले होते़  त्यानुसार ही रक्कम प्राप्त झाली असून, ‘एअर इंडिया’चा निर्गुंतवणूक व्यवहार पूर्ण झाल्याचे अर्थमंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले़  १०० टक्के समभागांसह ‘एअर इंडिया’चा मालकी हक्क ‘टाटा’कडे सुपूर्द केल्याचे गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले़

नव्या मालकांच्या पंखाखाली ‘एअर इंडिया’ची भरभराट होईल आणि संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्राला बळकटी मिळेल, असा आशावाद हवाई वाहतूक जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाईन्स’ कंपनीची स्थापना केली होती़  कराचीहून मुंबईला कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले होते़  १९४६ मध्ये या कंपनीचे ‘एअर इंडिया’ असे नामकरण झाले़  १९५३ मध्ये ‘एअर इंडिया’चे राष्ट्रीयीकरण झाले़  आता ‘एअर इंडिया’ची मालकी पुन्हा ‘टाटा समूहा’कडे आल्याने ६९ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण झाले आहे़  मिठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही आणखी एक दिमाखदार कामगिरी मानली जाते़  आता ‘एअर इंडिया’ला कर्जातून बाहेर काढण्याचे आव्हान टाटा समूहापुढे असेल़

‘आता सुवर्णकाळ…’

’आता पुढील काळ हा ‘एअर इंडिया’चा सुवर्णकाळ असेल, असा विश्वास व्यक्त करत टाटा समूहाचे अध्यक्ष एऩ़ चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले़

’टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकल्यापासून प्रत्येकाच्या ओठावर एक शब्द आहे, तो म्हणजे घरवापसी़  जवळपास सात दशकांनी ‘एअर इंडिया’ पुन्हा ‘टाटा समूहा’त दाखल होत असल्याचा आनंद आहे, असे चंद्रशेखरन म्हणाले़

’ आता आपण काय साध्य करू शकतो, याची प्रतीक्षा संपूर्ण देशाला असून, सर्व कर्मचाऱ्यांनी कटिबद्धतेने काम करावे, असे आवाहन चंद्रशेखरन यांनी केले़

ताफ्यात तिसरी विमान कंपनी

‘एअर इंडिया’ची मालकी पुन्हा मिळाल्याने टाटा समूहाकडील विमान कंपन्यांची संख्या तीन झाली आहे़  टाटा समूह ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्या चालवत असून, त्यात आणखी एक भर पडली आहे़  मात्र, ‘एअर इंडिया’चे पुनरुज्जीवन हे ‘टाटा समूहा’पुढील आव्हान आहे़

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Owned air india tata group airlines e chandrasekaran chairman tata sons akp

Next Story
मुखपट्टीबाबत कृतीगटातर्फे अभ्यास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी